मडुरा : एकीकडे अनियमित पावसामुळे शेती संकटात सापडली असताना, दुसरीकडे रानटी प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी अधिकच गंभीर बनल्या आहेत. पाडलोस -केणीवाडा येथील शेतकरी राजन तुकाराम नाईक यांनी मोठ्या कष्टाने व खर्च करून केलेली भातलावणी गवा रेड्यांच्या कळपाने दुसऱ्यांदा फस्त केल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पावसाने दडी मारल्याने मोटर पंपाच्या साहाय्याने पाणी देत त्यांनी लावणी केली होती. महागडी खते, वाढलेली मजुरी, शेती मशागतीचा खर्च आणि स्वतःच्या अथक परिश्रमांनंतरही उभे पीक काही क्षणांत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. गव्यांनी पुन्हा शेतात प्रवेश करून संपूर्ण लावणीची नासधूस केली. त्यामुळे केवळ आर्थिक नुकसानच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवरही पाणी फिरले आहे. अशा घटना परिसरात वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.