कुडाळ : कुडाळ -लक्ष्मीवाडी भंगसाळ नदी महापुरुष मंदिराशेजारी उद्यान विकसित करण्यासाठी जागा खरेदी करण्याच्या विषयावरुन नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व नगरसेवक नीलेश परब यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. दोन सत्ताधारी सदस्यांमधील या शाब्दीक खडाजंगीने शाब्दिक खटके उडाले. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ चांगलेच तापले.
कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा गुरूवारी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली न. पं. दालनात झाली. प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, भाजप गटनेते विलास कुडाळकर व सर्व नगरसेवक उपस्थित होते.
शहरातील लक्ष्मीवाडी -भंगसाळ नदी महापुरुष मंदिराशेजारी उद्यान प्रस्तावीत आहे. मात्र यासाठी जागा खरेदी करण्यास सतरा पैकी नऊ नगरसेवकांचा विरोध आहे. असे असताना हा ठराव कसा मंजूर करण्यात आला? असा सवाल भाजपचे नगरसेवक नीलेश परब यांनी केला. त्याठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमी असल्यामुळे त्या जागेत उद्यान होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही मागील सभेत या विषयाला हरकत घेतली होती. तरीही या ठरावाला मंजुरी कोणी दिली? असा सवाल त्यांनी केला. सभागृहातील इतर नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. मग आमचे म्हणणे का घेतले नाही? नगरसेवकांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार नाही का? असे सवाल परब यांनी नगराध्यक्षांना केले.
यावर उत्तर देताना नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर म्हणाल्या, आपण याबाबत मागील सभेत मतदान घ्यायला सांगितले होते. तुम्ही अभ्यास करून या आणि त्यानंतर सभागृहात बोला, असे त्यांनी परब यांना सुनावले. यामुळे परब आक्रमक झाल्याने नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर व नीलेश परब यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. गणेश भोगटे यांनी मध्यस्थी करीत शांत करण्याचा प्रयत्न केला.
सभेत विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली. कुडाळ शहरातील नाल्यांतील काढण्यात आलेला गाळ त्याठिकाणीच बाजूला टाकण्यात आला आहे. पावसाळ्यात हा गाळ पुन्हा नाल्यांत जाऊन नाले बुजणार आहेत. तसेच हा गाळ आजूबाजूला जाऊन पुन्हा पूरस्थिती निर्माण होणार आहे, असे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सांगितले. तर गेली दोन वर्षे हा गाळ नाल्याच्या बाजूलाच टाकला जात आहे, असे विलास कुडाळकर यांनीही सांगितले. त्यामुळे हा गाळ आताच शेतकरी, बागायतदारांना न्यायला सांगा, असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
नगरपंचायतीमधील अधिकार्यांना बैठक व्यवस्था बनविण्याबाबत ठराव सर्वांनुमते घेण्यात आला. सुरुवातीला दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी त्या ठरावात दुरुस्ती करून तो ठराव लिहून घेण्यास सांगितले. यावर, सभागृहात आमच्याकडे बहुमत असूनही आमचे नऊ नगरसेवकांचे म्हणणे घेतले जात नाही. येथे मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप नगरसेवक उदय मांजरेकर यांनी केला.