Rain 
सिंधुदुर्ग

Weather Forecast- पुढील दोन आठवड्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

Below Normal Rainfall-भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण कृषी सल्ला

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : विस्तारित श्रेणी हवामान अंदाज (ERFS) नुसार पुढील दोन आठवड्यांत कोकण विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण कृषी मौसम सेवा (मुळदे) केंद्राने भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण कृषी सल्ला जारी केला आहे. शेतकऱ्यांनी भात पुनर्लागवडीची कामे लवकरात लवकर उरकून घ्यावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ ते १६ जुलै या कालावधीत कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये प्रतिदिन १० ते २० मि.मी. पाऊस पडण्याची शक्यता असून हे प्रमाण सरासरीपेक्षा १५ टक्क्यांहून अधिक कमी असणार आहे. तर दुसऱ्या आठवड्यात १६ ते २३ जुलै उत्तर कोकणातील पालघर, ठाणे व रायगड जिल्ह्यात प्रतिदिन १० ते २० मिमी सरासरीपेक्षा २ ते ४ टक्के कमी आणि दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन २० ते ४० मि.मी. पावसाचा अंदाज आहे. दक्षिण कोकणातही हा पाऊस सरासरीपेक्षा ४ ते ७ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाळ्याच्या उत्तरार्धात एल निनोचा प्रभाव जास्त जाणवणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच पाणी नियोजनावर भर देणे आवश्यक आहे.

भात पुनर्लागवडीनंतर पहिल्या ३० दिवसांत खाचरांमध्ये २.५ ते ५.० सेमी पाण्याची पातळी राखणे अत्यंत आवश्यक असते. कमी पावसामुळे खाचरे कोरडी पडण्याची शक्यता असल्याने पावसाचे पडणारे पाणी शेतातच साठवण्यासाठी खाचरांची मजबूत बांधबंदिस्ती करून घ्यावी. पाणी पातळी योग्य राखल्यास शेतातील तणांचा उपद्रव कमी होण्यास मदत होते. भात पिकाची फुटवे फुटण्याची अवस्था जमिनीतील ओलाव्यासाठी अत्यंत संवेदनशील असते. या काळात पाण्याची कमतरता भासल्यास उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खाचरे कोरडी पडल्यास शेजारील ओहोळ, नाले यांसारखे नैसर्गिक प्रवाह शेताकडे वळवून पाण्याची पातळी सुस्थितीत ठेवावी.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी तातडीने मदत मिळावी याकरिता कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टल आणि जि. प. कृषी विभागाने पोर्टेबल वॉटर पंप व पीव्हीसी पाईप्स आदी घटकांची त्वरित सोडत (लॉटरी) काढून शेतकऱ्यांना साहित्य उपलब्ध करून द्यावे, असेही ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

खत व्यवस्थापन आणि सिंचन साधनांची पूर्वतयारी

शेती तज्ज्ञांच्या माहितीनुसार, भातखाचरे कोरडी पडल्यास युरिया खतातून अमोनिया वायूचे बाष्पीभवन होण्याची दाट शक्यता असते. जमिनीतील ओलावा घटल्यास नायट्रोजनचे वायुरूपात वेगाने रूपांतर होते, ज्यामुळे पिकाची खत वापर कार्यक्षमता कमी होते आणि पर्यायाने उत्पादनात घट होते. ही घट टाळण्यासाठी शेतात योग्य ओलावा राखणे गरजेचे आहे. वरकस जमिनीत रासायनिक खतांचा वापर माफक प्रमाणात करावा, तसेच आणीबाणीच्या प्रसंगी नदी, ओढे किंवा लघु पाटबंधारे या बाह्य स्रोतांतून सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांनी पोर्टेबल पंप आणि पी.व्ही.सी. पाईप या साधनांची दुरुस्ती करून ठेवावी. गरज भासल्यास गट शेतीच्या माध्यमातून परस्पर सहकार्यातून पाणी पातळी राखण्याचे प्रयत्न करावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT