बँक व्यवस्थापकाने आरे तलावात उडी घेऊन संपविले जीवन  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : बँक व्यवस्थापकाने आरे तलावात उडी घेऊन संपविले जीवन

कारण अस्पष्ट; मुणगे शाखेत होते कर्यरत

पुढारी वृत्तसेवा

देवगड ः सिंधुदुर्ग बँकेचे देवगड-मुणगे शाखा व्यवस्थापक अविनाश काशीराम तळवडेकर (51, मूळ रा. आरे - बौद्धवाडी, सध्या रा. मुणगे) यांनी आरे - जेठेवाडी येथील कौल कारखान्यानजीक असलेल्या तळ्यात उडी घेऊन जीवन संपविले. ही घटना 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. च्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली असून यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेने देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ आरे -बौद्धवाडी येथील अविनाश तळवडेकर हे सिंधुदुर्ग बँकेच्या मुणगे शाखेत व्यवस्थापक म्हणून गेली दीड वर्षे कार्यरत होते. सध्या ते मुणगे येथेच पत्नीसमवेत भाड्याने वास्तव्यास होते. 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास अविनाश तळवडेकर हे पत्नी सुनीता हिला बँकेत जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेले. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. ते न सापडल्याने त्यांची पत्नी सुनीता यांनी 26 नोव्हेंबर रोजी पहाटे 4.20 वा. च्या सुमारास देवगड पोलिस स्थानकात बेपत्ता फिर्याद दाखल केली. दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी स.10 वा. च्या सुमारास आरे जेठेवाडी येथील कौल कारखान्यानजीक अविनाश तळवडेकर यांची दुचाकी व मोबाईल आढळून आला. तसेच तेथील तळ्यात त्यांचा मृतदेह तरंगताना स्थानिक ग्रामस्थांना आढळून आला. या घटनेची माहिती समजताच देवगडचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, उपनिरीक्षक संतोष भालेराव, हवालदार आशिष कदम, महेंद्र महाडिक यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन देवगड ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. घटनेची फिर्याद आरे पोलीस पाटील राजेंद्र बाबाजी कदम (रा. आरेश्वरवाडी) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. घटनेचा तपास पोलिस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.

अविनाश तळवडेकर यांनी सिंधुदुर्ग बँकेच्या जामसंडे शाखेत, कुणकेश्वर शाखेत यापूर्वी काम केले होते. सध्या ते मुणगे शाखेत व्यवस्थापक पदावर काम करीत होते. त्यांचा पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, पुतणी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT