जप्त गोवा दारूसोबत बांदा पोलीस कर्मचारी. (छाया : विराज परब) 
सिंधुदुर्ग

Goa Liquor Smuggling | बांदा पोलिसांची गोवा दारू वाहतुकीवर धडक कारवाई

दोन स्वतंत्र कारवायांमध्ये दारूसह दुचाकी, कार जप्त

पुढारी वृत्तसेवा

बांदा : गोवा राज्यातून सिंधुदुर्गात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात बांदा पोलिसांनी सलग दोन कारवाया करत तब्बल ५ लाख ९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एक दुचाकी, एक चारचाकी आणि मोठ्या प्रमाणात गोवा मद्यसाठा हस्तगत केला.

पहिली कारवाई गुरुवारी रात्री बांदा पोलिस चेक नाक्यावर करण्यात आली. नागेश आनंद चव्हाण (रा. ओसरगाव, ता. कणकवली) हा दुचाकीवरून गोवा दारू वाहतूक करताना पोलिसांच्या ताब्यात आला. त्याच्याकडून विविध ब्रँडच्या मद्याच्या बाटल्या आणि दुचाकीसह सुमारे ४९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी पहाटे त्याच ठिकाणी करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत सुधीर खुबू राठोड (रा. साहिलवाडा, ता. सावंतवाडी) याच्या ताब्यातील टोयोटा ग्लांझा कारची तपासणी केली असता आत मोठ्या प्रमाणात गोवा दारू आढळून आली. यामध्ये मॅकडॉवेल्स, इम्पिरियल ब्ल्यू आणि गोल्डन एस व्हिस्कीच्या बाटल्यांचा समावेश असून कारसह ४ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या या दोन कारवायांमुळे अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गोवा सीमेलगतच्या भागात सुरू असलेल्या अवैध मद्य वाहतुकीवर पोलिसांनी प्रभावी अंकुश ठेवण्यास सुरुवात केली असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या दोन्ही कारवाया बांदा पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, सहा. फौजदार श्री. गवस, हेड कॉन्स्टेबल विलास भोगले, प्रथमेश पोवार, प्रसाद पाटील, राजा कापसे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT