बांदा : इन्सुली - कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (25) हिचा मृतदेह बुधवारी सकाळी तिच्या घरानजीकच्या ओहळात आढळून आला. ती इन्सुली येथील साऊथ कोकण डिस्टलरीज कंपनीत कामाला जाते म्हणून मंगळवारी गेली होती. सायंकाळी नेहमी प्रमाणे घरी न आल्याने शोधाशोध केली होती. रात्री उशिरा ती बेपत्ता असल्याची तक्रार बांदा पोलिसात तिचे काका मंगेश बाबू गावडे यांनी दिली होती.
दरम्यान शवविच्छेदन अहवालात वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी तिचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे म्हटले आहे. मात्र ज्या ठिकाणी तिचा मृतदेह आढळला, त्या ठिकाणी दोन फुट सुद्धा पाणी नसताना तिचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. बांदा पोलिसात तिच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
सोनाली गावडे ही साऊथ कोकण डिस्टलरीज मध्ये कामाला जायची. मंगळवारी नेहमीप्रमाणे ती घरातून डबा घेऊन सकाळी कामाला गेली. दरम्यान वाटेत रोज मिळणार्या शेजार्यांना तिने नेहमीप्रमाणे हाक मारली. स. 7.30 वा. च्या सुमारास महामार्गावर येऊन ती कंपनीच्या गाडीने कामावर जात असे. मात्र मंगळवारी ती थांब्यावर नसल्याचे समजते. तिचे वडील प्रभाकर गावडे हे शेर्ला येथील लाकूड गिरणीत कामाला जातात. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ती नेहमीप्रमाणे घरी न परतल्याने तिला कॉल केला असता तिचा फोन बंद आला. तिच्या कामावरील सहकार्यांना फोन केला असता ती आज कामावर आली नसल्याचे सहकार्यांनी सांगितले. यानंतर कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला, मात्र ती कुठेच आढळून आली नाही.
दरम्यान, ती जिथे रस्त्यावर गाडीसाठी उभी राहत होती तिच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र त्यातही ही दिसली नाही. अखेर कुटुंबियांनी मंगळवारी रात्री रात्री उशिरा ती बेपत्ता असल्याची खबर बांदा पोलिसात दिली. नातेवाईकानी व शेजार्यांनी परत पहाटे शोधाशोध केली असता ती घरानजिक असलेल्या शेतातील छोट्या ओहळात पडलेल्या स्थितीत दिसून आली.
याबाबत माहिती बांदा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सहा. पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे व पोलीस कर्मचारी रामा तेली उपस्थित होते. तिच्या पश्चात वडील, काका, काकी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
ज्या ठिकाणी तिचा मृतदेह आढळून आला त्या ठिकाणी दोन फुट सुद्धा पाणी नव्हते. दरम्यान तिच्या पाठीला लावलेली बॅग जशास तशी होती. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.