बांदा : बांदा बाजारपेठेतून चोरट्याने लंपास केलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची हिमालयन मॉडेल बुलेट मोटारसायकल पोलिसांनी शोधून काढली आहे. तसेच ही दुचाकी चोरणार्या म्हापसा (गोवा) येथील 19 वर्षीय भुवन तिलकराज पिल्ले याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातून अटक केली. विशेष म्हणजे, चोरी लक्षात येऊ नये म्हणून त्याने बुलेटचा मूळ रंग बदलण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली, एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वात हवालदार डॉमिनिक डिसोझा, सदानंद राणे, बसत्याव डिसोझा व जॅक्सन घोणसालवीस यांनी 4 जुलै रोजी ही कामगीरी केली.
बांदा पोलिस ठाण्यात रोहित श्रीकृष्ण काणेकर (रा. बांदा, कट्टा कॉर्नर) यांच्या तक्रारीवरून 5 जून रोजी त्यांच्या मालकीची बुलेट दुचाकी चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झाली होती.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून भुवन पिल्ले याच्यावर संशय बळावला. तो गोवा-कोलवाळे पोलिस ठाणे हद्दीत संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला. त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीत भुवन पिल्ले याने गुन्ह्याची कबुली दिली असून, हा गुन्हा त्याने आणखी दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड झाले आहे. चोरी केलेली बुलेट कुणालाही ओळखू येऊ नये म्हणून त्याचा रंग बदला होता. सदर बुलेट मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.