बांदा : गोवा राज्यातून सिंधुदुर्ग मार्गे केल्या जाणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर पत्रादेवी- बांदा मार्गावरील पंजाबी ढाब्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने गुरुवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत ४ लाख २० हजार ८४० रुपयांची दारू व १२ लाख रुपयांची चारचाकी असा एकूण १६ लाख २० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी शुभम शिवप्रसाद शितोळे (२७, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत विविध बॅण्डचे ८० खोके जप्त करण्यात आलेत. दारू वाहतुकीसाठी वापरलेली क्रेटा कार जप्त करण्यात आली. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. बांदा येथील पंजाबी ढाब्या नजीक गोव्यातून येणारी गाडी तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी गाडीच्या सीटवर व डिकीत गोवा दारूचे विविध ब्रँडचे ८० बॉक्स (३७६८ बाटल्या) आढळून आल्या. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास खडके, दुयम निरीक्षक प्रदीप रासकर, विवेक कदम, जवान रणजित शिंदे व सहकाऱ्यांनी केली.