सिंधुदुर्ग

Sindhudurg news | फणसाच्या झाडाला चक्क केळीचा घड

निसर्गाच्या चमत्काराची चर्चा ; 'अंनिस'ने केला उलगडा

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : वेले-फौजदारवाडी येथे फणसाच्या झाडाला चक्क केळीचा घड लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला याकडे दैवी चमत्कार म्हणून पाहिले जात असतानाच, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केलेल्या शास्त्रीय पाहणीनंतर यामागचे सत्य समोर आले आहे.

वेले येथील रहिवासी विश्राम पुंडलिक लिंगवत यांच्या घराशेजारील फणसाच्या झाडाला जमिनीपासून १० ते १५ फूट उंचीवर केळीच्या घडासारखी दिसणारी एक आकृती पाहायला मिळाली. फणसाच्या देठातूनच हा प्रकार बाहेर आल्याचे दिसल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांनी याला निसर्गाचा चमत्कार मानण्यास सुरुवात केली होती.

अंनिसचे संशोधन आणि वैज्ञानिक खुलासा

या घटनेची चर्चा होताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. विज्ञानाच्या कसोटीवर या घटनेचे विश्लेषण करताना त्यांनी खालील बाबी स्पष्ट केल्या.

जनुकीय बदल

निसर्गात अनेकदा जनुकीय किंवा रासायनिक बदलांमुळे फळाच्या मूळ आकारात बदल होतो. ही एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. फणसाचे गरे नैसर्गिक प्रक्रियेत बाहेरील बाजूला आल्यामुळे त्याला योगायोगाने केळीच्या घडासारखा आकार प्राप्त झाला. सुरुवातीला या अजब फणसाची बातमी कुतूहलाचा विषय ठरली असली, तरी अंनिस मुळे यातील वैज्ञानिक बाजू स्पष्ट झाली आहे. हा केवळ निसर्गाचा एक दुर्मिळ आविष्कार असून लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

"झाडातील काही मूलद्रव्यांमध्ये बदल झाल्यामुळे फळाच्या रचनेत हा वेगळेपणा दिसून आला आहे. हा कोणताही दैवी चमत्कार नसून केवळ निसर्गातील जनुकीय बदलाचा परिणाम आहे. नागरिकांनी अशा नैसर्गिक बदलांना चमत्काराचे रूप देऊन अंधश्रद्धेला बळी पडू नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये."
- डॉ. संजीव लिंगवत उपाध्यक्ष, अंनिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT