Crime News pudhari photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : स्वतःवर सुरीने वार करत जीवन संपविण्याचा प्रयत्न

चौके-साळेल चिरेखाणीत तरुणाकडून धक्कादायक प्रकार

पुढारी वृत्तसेवा

मालवण : गडहिंग्लज तालुक्यातील नीलजी येथील मानदेश निगोडा पाटील या तरुणाने चौके-साळेल मार्गावरील एका चिरेखाणीमध्ये स्वतःच्या गळ्यावर आणि शरीरावर धारदार सुरीने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी १० वा.च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मागचे कारण मात्र समजलेले नाही.

निलजी येथून चौके परिसरात चिरे भरण्यासाठी आलेल्या ट्रकवर मानदेश पाटील हा क्लीनर म्हणून आला होता. मंगळवारी सकाळी तो चौके-साळेल मार्गावरील चिरेखाणीवर गेला असताना, त्याने सोबत आणलेल्या धारदार सुरीने स्वतःच्या गळ्यावर, पोटावर आणि हातावर वार करून घेतले. यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी त्याला तातडीने चौके प्रा. आ. केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिली मिठारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. मालवणचे सहा. पोलीस निरीक्षक पी. पी. पाटील, उपनिरीक्षक आशिष भगत, हेमंत धुरी, सुहास पांचाळ, सूरज रेडकर आणि साळेलचे पोलिस पाटील रवींद्र गावडे यांनी चौके आरोग्य केंद्रात जाऊन माहिती घेतली.

जखमी तरुणाला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी चौकेचे माजी सरपंच राजा गावडे, नांदरूखचे सरपंच भाऊ चव्हाण, बंड्या गावडे, मानस गावडे, अमोल चव्हाण, साई गावडे व गोठ्या गावडे या ग्रामस्थांनी सहकार्य केले. या घटनेमुळे चौके आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून, तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याविषयी पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT