आरवली : मंगळवारी रेडी येथील प्रसिद्ध द्विभुज गणपती मंदिरात अंगारकी संकष्टीनिमित्त देवाच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. अंगारकी संकष्टी योग असल्याने मंदिर परिसरात भक्तांकडून सुरू असलेल्या गणपतीच्या जयजयकाराने आसमंत दुमदुमत होता. तब्बल 21 वर्षांनंतर श्रावण महिन्यात अंगारकी संकष्टीचा योग आल्यामुळे या अंगारकी संकष्टीला विशेष महत्त्व देण्यात आले.
सकाळी मंदिरात नित्याप्रमाणे पूजा, अर्चा झाल्यानंतर देवदर्शनासाठी भाविकांची सुरुवात झाली. गणपतीला आवडणारे लाल रंगाचे फूल, दुर्वा, मोदक, नारळ, अगरबत्ती घेऊन भाविक गणपतीचे मनोभावे दर्शन घेत होते.
भाविकांच्या सोयीसाठी रेडी गजानन देवस्थानकडून भाविकांच्या रांगांसाठी व्यवस्था केली होती. त्यामुळे सर्व भाविकांना व्यवस्थित दर्शन घ्यायला मिळत होते.
मंदिर परिसरात पूजा साहित्य व अन्य दुकानेही सजली होती. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ सुरू होती. श्रावण महिन्यात मंगळवारी अंगारकी संकष्टी येणे हा दुग्धशर्करा योग असल्यामुळे रेडी येथील गणपतीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, बेळगाव, गोवा, कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते.