Anganewadi Yatra 
सिंधुदुर्ग

Anganewadi Yatra : माऊली, आम्हा लेकरांवर तुझी अशीच कृपादृष्टी राहूदे!

आंगणेवाडी श्री भराडी देवी यात्रोत्सवाची भक्तिपूर्ण सांगता

पुढारी वृत्तसेवा

संतोष अपराज

मसुरे : आंगणेवाडी श्री देवी भराडी देवी यात्रोत्सवास सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी पहाटेपासून सुरुवात झाली होती. मंगळवार, 10 फेब्रुवारीपर्यंत दोन दिवस चाललेल्या या यात्रेत लाखो भाविकांनी श्रद्धापूर्वक उपस्थिती दर्शविली. नवस फेडत ‌‘माय माऊली, आम्हा लेकरांवर तुझी अशीच कृपादृष्टी राहूदे‌’ असे गाऱ्हाण घातले.

‌‘जय जय भराडी देवी‌’ गजर घुमला.....

श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवात सोमवारी रात्री भक्तांची तोबा गर्दी उसळली होती. ‌‘श्री देवी भराडी माते नमो नमः‌’ या मंत्रघोषात सोमवारी रात्री 9 वा.च्या सुमारास देवीला प्रसाद (ताटे) लावण्याच्या धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथम देवीच्या मानकऱ्यांची प्रसादाची ताटे देवीच्या प्रांगणात सुहासिनी महिलांनी डोक्यावर घेत पारंपरिक रूढी परंपरेने मंदिरात प्रवेश केला. यानंतर ग्रामस्थांनी स्वयंपाक घरात शिजवलेल्या प्रसादाची ताटे देवालयात आणण्यात आली. यावेळी मंदिरात भक्तांची एकच गर्दी झाली होती. ‌‘श्री देवी भराडी माते नमो नमः‌’ या मंत्रघोषात भक्त तल्लीन झाले होते.

मंदिरातील महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर प्रतिवर्षीप्रमाणे अनेक भाविकांनी आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद घेतला. या कार्यक्रमासाठी रात्री 9 ते 12 वा. या कालावधीत भक्तांसाठी देवीचे दर्शन बंद करण्यात आली होते. राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, तसेच चित्रपट क्षेत्रांतील मान्यवरांनी आई भराडी देवीच्या दर्शनासाठी आंगणेवाडीत उपस्थिती दर्शवली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, राजन विचारे, माजी आ. राजन तेली, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, हास्य जत्रा फेम अरुण कदम, उद्योजक डॉ. दीपक परब, सौ. राधिका परब, विशेष अधिकारी वर्षा झाल्टे, गटविकास अधिकारी शाम चव्हाण तसेच यांच्यासह इतर राजकीय नेते व अधिकारी वर्गाने देवीचे दर्शन घेतले.

मंत्री नितेश राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, बृहन्मुंबई सुधार समिती माजी अध्यक्ष सदा परब, मुंबईच्या नगर सेविका शर्वरी परब, पं. स. माजी सदस्य महेश बागवे, समर्थ पतपेढी अध्यक्ष प्रकाश परब, जेट एअरवेजचे अनिल बागवे, हिमराज सावंत, मंगलेश परब, प्रशांत मयेकर, प्रशासक वी. के. जाधव, सुनील चाव्हान, महसूल अधिकारी डी. व्ही. शिंगरे, दिपक लिंगायत, आनंद तांबे, सुगंध तांबे, आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, दिनेश आंगणे, अर्जुन आंगणे आदी उपस्थीत होते. आरोग्य सुविधा स्टॉल, वैधकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. कडक पोलिस बंदोबस्त होता तसेच आरोग्य यात्रणा सतर्क होती. आंगणेवाडी ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.

मंदिर परिसरात भव्य सभामंडप, बाजूला रस्त्याच्या बाजूला चल चित्र देखावा साऱ्याचे लक्ष वेधून घेत होता,गजबजलेली खाजा-मिठाईची दुकाने विविध शिबिरे, या ठिकाणी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला होत होता. विविध स्टॉल मध्ये असलेल्या वस्तु खरेदी करताना दिसत होते. भराडी देवी यात्रेस येणाऱ्या राज्यातील लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे तसेच रात्रौ महाप्रसाद प्रत्येक भाविकांना मिळावा यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ कटिबध्द होते.

आकर्षक विद्युत रोषणाईमुळे सेल्फीची भुरळ...

यात्रोत्सवाचे ठिकठिकाणी मोठ्या स्क्रीनवर दर्शन घडविले जात होते. तर मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई, लेझर किरणाचे दूरवर पडणारे प्रकाश झोत साऱ्याचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरा वर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे आंगणेवाडी या विद्युत रोषणाईने उजळून गेली होती. मंदिराच्या विद्युत रोषणाई सह आपल्या मोबाईल सेल वर आपली सेल्फी टिपताना युवावर्ग दिसून येत होता.

कोट्यवधीची उलढाल.....!

आंगणेवाडी यात्रेत मोठ्या संख्येने चाकरमानी भक्त आले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. व्यावसाईकांच्या मालाची चांगलीच विक्री झाली. चादर, खेळणी, शेती अवजारे, मिठाई दुकानदार, फनी गेम, मर्यादित असलेले हॉटेल व्यावसायिक, विविध स्टॉलधारक तेजीत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT