बैठकीत उपस्थित मंत्री नितेश राणे व आंध्र प्रदेशचे मत्स्य विभागाचे अधिकारी. 
सिंधुदुर्ग

Nitesh Rane| आंध्र प्रदेशातील मत्स्य व्यवसाय प्रयोग महाराष्ट्रात राबविणार

मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे; आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयाला भेट

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : दोनदिवसीय अभ्यास दौऱ्यादरम्यान मत्स्य व्यवसाय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशच्या मत्स्य आयुक्तालयाच्या मुख्यालयास मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन राज्यातील मत्स्य व्यवसाय व ॲक्वाकल्चर क्षेत्राच्या विकास मॉडेलचा सविस्तर अभ्यास केला. यावेळी मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील विविध आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादकता वाढ, मच्छीमार कल्याण तसेच एकात्मिक मत्स्य मूल्य साखळीबाबत सविस्तर माहिती व आढावा घेण्यात आला. मत्स्य उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात आंध्र प्रदेशने काही आधुनिक प्रयोग यशस्वी केले असून, हे प्रयोग महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याचे मत्स्य व्यवसायमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.

आंध्र प्रदेश मत्स्य आयुक्तालयात झालेल्या बैठकीत सागरी मत्स्य व्यवसाय, अंतर्देशीय मत्स्य व्यवसाय आणि ॲक्वाकल्चर क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले. AI आधारित Aquaculture ४.०, मत्स्य आरोग्य व रोगांचे निरीक्षण, पाण्याच्या गुणवत्तेचे रिअल टाईम परीक्षण, स्मार्ट फीडिंग, माशांच्या वर्तनाचे विश्लेषण, RAS व Biofloc, IoT आधारित ॲक्वाकल्चर, डिजिटल ट्रेसेबिलिटी, तलाव नोंदणी, प्रजाती विविधीकरण, बोटींचे ट्रॅकिंग आणि मासेमारीतील पकड निरीक्षण याबाबत ना. राणे यांनी माहिती घेतली.

समुद्री शेवाळ लागवड, कृत्रिम प्रवाळ भित्तिका, खुल्या समुद्रातील केज कल्चर, हवामान बदलास सक्षम किनारी मच्छीमार गावे आणि अंतर्देशीय जलस्रोतांचा शास्त्रीय पद्धतीने उपयोग या विषयांचाही अभ्यास करण्यात आला. हॅचरी, मत्स्य खाद्य, प्रयोगशाळा, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात यांना परस्परांशी जोडणाऱ्या एकात्मिक मत्स्य मूल्य साखळीच्या विकास मॉडेलबाबतदेखील सविस्तर माहिती घेण्यात आली. मत्स्य व्यवसायातील उत्पादनापासून ते प्रक्रिया, बाजारपेठ आणि निर्यातीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मत्स्य शेतकरी आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढविण्याच्या आंध्र प्रदेशच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला.

आंध्र प्रदेशचे मत्स्य आयुक्त रामा नाईक, अतिरिक्त संचालक डॉ. शंकर राव, महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, मत्स्य व्यवसायतज्ज्ञ मनोज शर्मा, सहआयुक्त महेश देवरे, नागनाथ भादुले यांच्यासह आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मच्छीमारांचे उत्पन्न वाढवण्याचा नवा प्रयत्न

आंध्र प्रदेशातील तंत्रज्ञान, डेटा-आधारित व्यवस्थापन आणि संस्थात्मक कार्यपद्धतीतील महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या बाबींचा अभ्यास करून, त्यांचा राज्यातील मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी प्रभावी वापर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मच्छीमार बांधवांचे उत्पन्न वाढविणे, मत्स्य शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम, शाश्वत व जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविणे हे या अभ्यास दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे ना. राणे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT