amboli rain  
सिंधुदुर्ग

Amboli rainfall surpasses Cherrapunji |प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीमध्ये यंदा धुवांधार पाऊस, चेरापुंजीलाही टाकले मागे

ऑगस्ट अखेरपर्यंत आंबोलीत तब्बल २५० इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद, सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत पाऊस तब्बल ४०० इंचांपर्यंत पोहोचण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोलीने पावसाच्या बाबतीत देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या मेघालयातील 'चेरापुंजी'लाही मागे टाकले आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदाच्या मान्सून हंगामात ऑगस्ट अखेरपर्यंत आंबोलीत तब्बल २५० इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्याअखेरपर्यंत हा आकडा तब्बल ४०० इंचांपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आंबोलीसह पश्चिम घाटाच्या पट्ट्यात पावसाने आपली मजबूत पकड कायम ठेवली. चेरापुंजी आणि मौसिनराम ही ठिकाणे देशातील सर्वाधिक पावसासाठी ओळखली जातात; मात्र या मोसमात आंबोलीने चेरापुंजीपेक्षाही जास्त पावसाची नोंद करून नवा इतिहास रचला आहे.

आंबोलीमध्ये ऑगस्टपर्यंत झालेला २५० इंचांहून अधिक पाऊस पाहता, चालू सप्टेंबर महिन्यातही अधूनमधून सुरू असणाऱ्या सरींमुळे एकूण पावसाचा आकडा ४०० इंचांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, देशातील इतर भागांत पावसाचे लहरी रूप पाहायला मिळत आहे. बिहारमधील प्रमुख नद्यांना पूर आल्याने २७ लाख नागरिक प्रभावित झाले आहेत, तर मध्य प्रदेशात सरासरीच्या ८३.५ टक्के पाऊस पडला आहे. अशा विषम वातावरणात महाराष्ट्रातील आंबोलीची ही विक्रमी कामगिरी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT