आंबोली : संकेश्वर बांदा (एनएच ५४८) माहामार्गावर आंबोली घाटातील मुख्य दरड कोसळलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या धबधब्यालगत रस्त्यावर भले मोठे दोन ते तीन दगड थेट रस्त्यावर रात्री ८ वा. सुमारास कोसळले.
या मुख्य घाटमार्गावर नेहमीप्रमाणे मोठी वाहनांची वर्दळ सुरू होती. मात्र सुदैवाने ज्यावेळी हे दगड कोसळले त्यावेळी त्या भागात कोणतंही वाहन नसल्याने मोठी हानी टळली. सद्यस्थितीत हे दगड त्याच ठिकाणी असून दुचाकी व छोट्या चारचाकी गाड्यांची एक मार्गी वाहतूक सुरू आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ दखल घेत महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना हे दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत महामार्ग प्राधिकरणच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी जेसीबी पाठविण्यात आला असुन लवकरच हे दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली होती.
आंबोली परिसरात गेले चार दिवस जोरदार पाऊस सुरू असून वीज सुद्धा गेले ५ दिवस नसल्याने आंबोली परिसरातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तसेच वीज नसल्याने पर्यटन व्यवसायिकांचे देखील आर्थिक मोठे नुकसान झालेले आहे.