Amboli Tourism 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : आंबोलीच्या जंगलातील चमकणारी बुरशी म्हणजे ‘बायोल्युमिनेसेंट फंगी’

छायाचित्रकारांसाठी ठरतेय विशेष आकर्षण

पुढारी वृत्तसेवा

निर्णय राऊत

आंबोली : घनदाट जंगलात रात्रीच्या अंधारात अद्भुतरित्या एक चमकणारी 'जैवप्रकाशी बुरशी' म्हणजेच 'बायोल्युमिनेसेंट फंगी' ही त्याच्या हिरवट किंवा काहीसा सफेद, पिवळट प्रकाशाचे चित्र दाखवणारा नयनरम्य असा एक दुर्मिळ बुरशीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात पश्चिम घाटातील (सह्याद्री) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, दोडामार्ग, तिलारी व वेंगुर्ला परिसरातील जंगलात पावसाळ्यात ही नयनरम्य तथा विशेष दृश्ये सहज पाहायला मिळतात. पावसाळ्यात तर जैवप्रकाशी बुरशी ही निसर्गप्रेमीं तसेच छायाचित्रकारांना विशेष भुरळ घालत आहे.

जैवप्रकाशी बुरशी म्हणजे स्वतःहून सतत थंड, हिरवट प्रकाश निर्माण करणारे सजीव. जगभरात अशा बुरशींच्या सुमारे १३० हून अधिक प्रजाती ज्ञात आहेत. त्यांपैकी बहुतेक Mycena, Omphalotus आणि Armillaria या प्रमुख गटांमध्ये मोडतात. या बुरशी प्रामुख्याने गडद, दमट उष्णकटिबंधीय (Tropical) आणि समशीतोष्ण (Temperate) जंगलांमध्ये आढळतात. यावरूनच त्या परिसराची समृद्ध जैवविविधता अधोरेखीत होते. यात सह्याद्रीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, दोडामार्ग व आदी परिसर हा तर जणु हॉट स्पॉटच! येथे सहज जैवप्रकाशी बुरशी आढळून येते. पावसाळ्या सह हिवाळा व उन्हाळ्यातही बुरशी दिसून येते. त्यामुळे निसर्गाची अद्भुत किमयाच असलेली चमकणारी बुरशी पाहाण्यासाठी देखील निसर्गप्रेमी पर्यटक हे आंबोली व दोडामार्ग सारख्या ठिकाणांना आवर्जून भेट देतात!

सध्या जैवप्रकाशी बुरशी'वर अनेक अभ्यासक संशोधन करत असून पुणे येथील अभ्यासक आदित्य नानिवडेकर ह्या बुरशी बाबत सांगतात की, या बुरशीमध्ये ल्युसिफेरेज (Luciferase) नावाचे एन्झाइम, ल्युसिफेरिन (Luciferin) नावाच्या संयुगाशी आणि प्राणवायू (Oxygen) यांच्या उपस्थितीत अभिक्रिया करते. जसे रासायनिक प्रकियाच, याच अभिक्रियेमुळे हिरवट प्रकाश निर्माण होतो. तर काजव्यांप्रमाणे या बुरशी लुकलुकत नाहीत. त्या २४ तास सतत प्रकाश उत्सर्जित करतात, मात्र हा प्रकाश आपल्या डोळ्यांना पूर्ण अंधारातच स्पष्ट दिसतो. या प्रक्रियेत निर्माण होणारा प्रकाश थंड हिरव्या रंगाचा (सुमारे ५२०–५३० नॅनोमीटर तरंगलांबीचा) असतो. या प्रकाशामुळे उष्णता निर्माण होत नाही, त्यामुळे ऊर्जा वाया जात नाही.

या बुरशी प्रकाश का निर्माण करतात?

किटकांना आकर्षित करण्यासाठी ही बुरशी प्रकाश निर्माण करते. यावर अनेक शास्त्रज्ञांच्या मते, रात्री सक्रिय असणारे कीटक या हिरव्या प्रकाशाकडे आकर्षित होतात. हे कीटक बुरशीचे बीजाणू (Spores) आपल्या शरीरावर घेऊन इतर ठिकाणी पोहोचवतात, ज्यामुळे बुरशीचा प्रसार होण्यास मदत होते. तसेच दुसऱ्या मतानुसार, हा प्रकाश कोणत्याही विशिष्ट उद्देशाने नसून, मृत लाकूड विघटित करताना बुरशीच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा किंवा रासायनिक ताण (Chemical Stress) नियंत्रित करण्याचा एक उपपरिणाम असू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT