वैभववाडी ः आखवणे -भोम पुनर्वसन गावठाणाला अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी देणे यासह पुनर्वसन गावाठाणातील समस्या सोडविण्याचे आश्वासन मध्यम पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए. पी.पाटील यांनी अरुणा धरणग्रस्तांच्या कृती समितीला दिले.
अरुणा धरणग्रस्तांच्या कृती समिती समवेत अधीक्षक अभियंता यांच्या सिंधुदुर्गनगरी येथील दालनात झालेल्या बैठकीत हे आश्वासन देण्यात आले. कार्यकारी अभियंता हर्षल यादव, उपभियंता अभय मगरे, सहा.अभियंता विजयकुमार भंगर्गी, श्री. बोंद्रे तसेच धरणग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी रंगनाथ नागप, आकाराम नागप, डॉ.जगन्नाथ जामदार,अभय कांबळे श्री. तळेकर, श्री. पडिलकर, शिवराम जाधव तुकाराम मोरे आदी उपस्थित होते.
अरुणा धरण कालव्याचे पाणी आखवणे-भोम, नागपवाडी पुनर्वसन गावठाणाला द्यावे, अशी मागणी सुरुवातीपासून करूनही त्याकडे पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या धरणग्रस्तांनी हेत, तिरवडे, मांगवली येथे सुरू असलेले कालव्याचे काम बंद पाडले होते. याची दखल घेत अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांनी धरणग्रस्त कृती समितीसोबत बैठक घेतली. या बैठकीत कालव्याचे पाणी पुनर्वसन गावठाणाला देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसा प्रस्ताव तयार करून त्याची मंजुरी घेण्यात येईल, असे अधीक्षक अभियंता श्री.पाटील यांनी सांगितले.पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधामध्ये अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, क्रीडांगण यासह पाटबंधारे विभागांतर्गत येत असलेली कामे करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या कामासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देण्यास तयार आहोत. ती कामे एकतर जिल्हा परिषदेने करावीत किंवा ती कामे आम्हाला करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्रमाणपत्र द्यावे, यासाठी आम्ही जि. प. प्रशासनाकडेे पाठपुरावा करीत असल्याचे कार्यकारी अभियंता हर्षल यादव यांनी सांगितले.
दरम्यान, अपात्र ठरवलेल्या निवासी भूखंड धारकांना पात्र करण्यासाठी शासन स्तरावर पाच वर्षापूर्वी प्रस्ताव करण्यात आला आहे. त्यासंदर्भात आपल्याकडून पाठपुरावा होणे आवश्यक आहे. मात्र तो होताना दिसत नाही. तसेच काही पात्र लाभार्थ्यांना अद्याप भूखंड वाटप करण्यात आलेले नाही. त्यांना भूखंड वाटप करावे अशी मागणी करण्यात आली. यावर अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांनी शासन स्तरावर त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
पुनर्वसन गावठाणातील ग्रामपंचायत कार्यालयासाठी ग्राम सचिवलायचा प्रस्ताव करण्यात आला आहे. असे कार्यकारी अभियंता यांनी कृती समिती पदाधिकार्यांना सांगितले. रिंग रोडसाठी संपादीत जमिनीचा शेतकर्यांना मोबदला मिळावा. तिनही गावठाणात जागा निश्चिती करून गार्डन बनवावे. धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी पूर्वी संपादित जमिनीच्या बाहेर धरणाचे पाणी जात असल्यामुळे ती जमीन संपादीत करावी व त्याचा मोबदला शेतकर्यांना मिळावा, अशी मागणी करण्यात आली. याबाबत महसूल विभागाकडून आवश्यक माहिती घेऊन संपादना बाहेर पाणी जात असेल तर ती जमीन संपादित करण्यात येईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
शेत जमिनीसाठी पात्र शेतकर्यांना शेतजमीन उपलब्ध करावी. जोपर्यंत शेत जमीन मिळत नाही, तोपर्यंत धरणग्रस्तांना निर्वाह भत्ता देण्यात यावा. अशी मागणी धरणग्रस्तांकडून करण्यात आली. कार्यकारी अभियंता यांनी चालू निर्वाह भत्ता आलेला आहे. लवकरच त्याचे वितरण करण्यात येईल, असे सांगितले. यावर पर्यायी शेत जमीन देण्यासाठी लाभ क्षेत्रातील किती जमीन उपलब्ध आहे. याची माहिती द्या. पर्यायी जमीन उपलब्ध नसेल तर त्याबदल्यात एकरकमी अनुदान द्या, अशी मागणी कृती समिती पदाधिकार्यांनी केली.