kokanvasi instead of chakarmani government notification
सिंधुदुर्ग : कोकणातील बहुतांश तरुण रोजगार आणि व्यवसायाच्या संधींसाठी मुंबई, पुण्यासह इतर मोठ्या शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून या तरुणांना ‘चाकरमानी’ या नावाने संबोधले जात होते. मात्र, या शब्दाचा अवमानकारक स्वरूप असल्याची भावना कोकणातील अनेक संघटनांनी व्यक्त केली होती.
या संदर्भात काही संघटनांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे औपचारिक मागणी केली होती. त्यांनी ‘चाकरमानी’ या शब्दाऐवजी ‘कोकणवासी’ हा शब्द अधिक सन्मानजनक आणि योग्य असल्याचे मत मांडले. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.
लवकरच राज्य सरकारकडून अधिकृत परिपत्रक जारी होणार असून, यानुसार आता सरकारी कागदपत्रांपासून ते सार्वजनिक संदर्भांमध्ये ‘चाकरमानी’ऐवजी ‘कोकणवासी’ हा शब्द वापरण्यात येईल. या निर्णयामुळे कोकणातील रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ऐन गणेशोत्सवात हा निर्णय घेऊन आपली ओळख सन्मानाने जपली गेल्याचे समाधान कोकणवासीयांतून व्यक्त केले जात आहे.
‘चाकरमानी’ या शब्दात गुलामीची छटा जाणवते, कारण ‘चाकर’ म्हणजे सेवक किंवा नोकर तर ‘मानी’ म्हणजे मानणारा. या शब्दाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी, तो अवमानकारक असल्याची भावना कोकणातील अनेक संघटनांनी व्यक्त केली जात होती. हा शब्द बोलीत भाषेत प्रचलित झाला होता. हा शब्द गुलामीचे प्रतीक दर्शवितो. त्यामुळे तो शासन दरबारी वापरला जाऊ नये, अशी मागणी होऊ लागली होती.