कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरस येथे एक एअर पिस्टल गन व कोयता घेऊन तिघेजण संशयास्पद फिरताना आढळले. यातील एकाला पोलिसांनी घटनास्थळी पकडले. तर अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झालेल्या दोघांपैकी एकाला सावंतवाडी येथे मंगळवारी सकाळी पकडण्यात आले.
गंगाराम शंकर कांबळे (31, रा. गारगोटी- आंबेडकरनगर), नितीन सुखदेव कांबळे (रा. गारगोटी आंबेडकरनग) व भांडया (पूर्ण नाव गाव माहित नाही) अशा तिघांवर शस्रे बाळगुन दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयीतरित्या फिरत असताना आढळून आल्याप्रकरणी कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी रात्री 2.25 वा. च्या सुमारास घडली.
या घटनेची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल आनंद अर्जुन पालव यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे 30 सप्टेंबर रोजी रात्री सावंतवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुमरस-तेलीवाडी येथे तीन व्यक्ती नंबर नसलेल्या अॅक्टीवा गाडीवरुन संशयीतरित्या फिरताना मिळून आले. त्यातील एकास अॅक्टीवा गाडीसह पकडलेले तर अन्य दोघे फरार झाले. संशयितांच्या नावा-गावांची खात्री केल्यावर त्याने आपले नाव गंगाराम शंकर कांबळे (31, रा. गारगोटी आंबेडकरनगर) असे सांगितले. तर फरार सहकार्यांची नावे नितीन सुखदेव कांबळे व भांडया अशी असल्याचे सांगितले.
संशयीताच्या टू व्हीलरची पोलिसांनी तपासणी केली असता डिकीमध्ये दीड हजार रूपये किमतीची एअर गन व फायबरची मूठ असलेला लोखंडी कोयता, एक लोखंडी पाना, एक मारुती सुझुकी अल्टो कारचे आरसी बुक सापडून आले. हे सर्व साहित्य व दुचाकी पोलीसांनी जप्त केला. यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातून देण्यात आली.