सिंधुदुर्गनगरी : आंदोलनात सहभागी कृषी सहायक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य. (छाया : संजय वालावलकर)
सिंधुदुर्ग

कृषी सहायक संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Agricultural Assistants protest: विविध मागण्यांसाठी आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : कृषी सहायकांना नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती द्या, कृषी सहायक ऐवजी कृषी अधिकारी पदनाम करा, सहायकाबरोबर ग्राम स्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस द्या, कृषी विभागाचा आकृतीबंध मंजूर करा, यासह विविध मागण्याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कृषी सहायक संघटनेने सोेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.

राज्य कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष बालाजी वाघमोडे, सचिव अमृता राणे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचार्‍यांनी हे आंदोलन छेडले. आपल्या विविध मागण्याबाबत शासनाने पूर्तता करावी यासाठी कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. मागण्याची पूर्तता न झाल्यास या पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कर्मचार्‍यांनी दिला. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनात कृषी सहायक कालावधी रद्द करून कृषी सहायकांना नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती द्यावी, कृषी सहायकांचे पदनाम बदलून कृषी सहायक अधिकारी असे करावे, कृषी विभागाचे संपूर्ण कामकाज ऑनलाईन होत असतानाही कृषी सहायकांना लॅपटॉप दिला जात नाही, कृषी सहायकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस द्यावा, निविष्ठा वाटपासाठी कृषी सहायकांना वाहतूक भाड्याचा आर्थिक भार सहन करावा लागत आहे, तरी विविध योजनेत कृषी सहायकांसाठी वाहतूक भाड्याची तरतूद करावी किंवा निविष्ठा वाटप परमिटद्वारे करावे.

अन्यथा खरीप हंगाम-2025 मधील निविष्टा वाटपावर संघटनेचा बहिष्कार असेल, कृषी सहायकांचा आकृतीबंध तात्काळ मंजुरी कक्षरावा, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाणे 4 / 1 याप्रमाणे करावे, समूह सहायकांची पदे पूर्वीप्रमाणे भरावी, क्षेत्रावरील अडचणीचा विचार करावा, नैसर्गिक आपत्ती पंचनामे करणे व तदनंतर करावयाच्या कामकाजाबाबत महसूल ग्रामविकास व कृषी विभागाच्या जबाबदार्‍या बाबत योग्य न्याय संगत कार्यपद्धती तयार करावी, अशी मागणी निवेदनात केली.

याचबरोबर कृषी सहायक संवर्गाच्या आस्थापना विषयक अडचणीची सोडवणूक करावी, यासह अन्य मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने शासनाला देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT