मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार आता संपूर्ण एसटी बस आरक्षित (ग्रुप बुकिंग) करण्यासाठी पूर्वी आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे गणेशभक्तांना स्वस्तात एसटी बसने प्रवास करता येईल.
या निर्णयाची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. गणेशोत्सव आणि एसटीचे कोकणवासीयांशी अनेक वर्षांपासून घट्ट नाते आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधून दरवर्षी हजारो कोकणवासी एसटीने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सुमारे ५ हजार एसटी बसेस आरक्षित केल्या जातात. प्रवाशांना गावी सोडल्यानंतर या बसेस रिकाम्या परत आणाव्या लागतात. त्यामुळे एसटी महामंडळाला इंधन तसेच चालक आणि वाहकांच्या अतिरिक्त कामाचा खर्च सहन करावा लागतो. डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि कर्मचाऱ्यांच्या अतिकालीन भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीचा खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवरच ३० टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
परिपत्रक लवकरच जारी होणार
कोकणवासीय आणि गणेशोत्सव मंडळांकडून अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. याबाबतची निवेदनेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली होती. याबाबतचे परिपत्रक एसटी महामंडळाकडून लवकरच जारी करण्यात येईल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. हे शुल्क रद्द करण्यात आल्याने एसटी महामंडळावर येणारा अतिरिक्त आर्थिक भार इतर मार्गांवरील प्रवासी वाहतूक वाढवून भरून काढण्याच्या सूचनाही त्यांनी एसटी प्रशासनाला दिल्या आहेत.