ओरोस ः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे. तिन्ही मतदारसंघातील मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी पाटील यांनी कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी येथील मतमोजणी केंद्रांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ऐश्वर्या काळुशे, जगदीश कातकर, हेमंत निकम, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे, वीरसिंग वसावे, श्रीधर पाटील आदी उपस्थित होते. मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, निवडणूक निरीक्षकांची बैठक व्यवस्था, विविध सोयी- सुविधांची उभारणी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी व्यवस्था, मतमोजणी पथके, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पोलिसांना पुरवायच्या सुविधा, पोलिस सुरक्षा, वाहनतळाची जागा निश्चिती, वाहतूक वळविणे, कायदा व व्यवस्थेबाबत माहिती घेतली.
विधानसभेच्या मतमोजणीसाठी तीनही विधानसभा मतदारसंघनिहाय भारत निवडणूक आयोगाने केंद्रीय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. यात कणकवलीसाठी परवीनकुमार थिंद, कुडाळसाठी पुष्पराज सिंह आणि सावंतवाडीसाठी प्रशांत आर. यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
मतमोजणीच्या सुरूवातीस सकाळी 8 वाजता टपाली मतपत्रिकांची व ईटीबीपीएसची मोजणी सुरू होणार आहे. त्यानंतर 8.30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीची माहिती पुढीलप्रमाणे- कणकवली- फेरी 24, टेबल 14, कर्मचारी संख्या 250, कुडाळ -फेरी 20 टेबल, टेबल 14, कर्मचारी संख्या 260 , सावंतवाडी- फेरी 23, टेबल 20, कर्मचारी संख्या 200
मतमोजणी केंद्राशेजारी माध्यम प्रतिनिधींसाठी मिडीया कक्ष तर उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी कम्युनिकेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत. मिडीया कक्षात भारत निवडणूक आयोगामार्फत पासेस देण्यात आलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येणार आहेत. मतमोजणी केंद्रांत मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रात कोणीही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नयेत,असे आवाहन करण्यात आले आहे.