Aditi Parab Miss India 2025
आरवली : 31 जुलै रोजी खढउ फॉरचून वाशी-नवी मुंबई येथे आयोजित दि इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट मिस इंडिया -2025 स्पर्धेत वेंगुर्ल्याची अदिती परब हिने ‘मिस इंडिया-2025’ हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला.
मूळ गाव वेंगुर्ले तालुक्यातील मांगल्याचा मठ-परबवाडी येथील रहिवासी असलेली अदिती सध्या दहिसर-मुंबई येथे राहते. येथील कृष्णा आणि सौ. कृतिका परब यांची ती कन्या आणि कै. चंद्रकांत परब यांची ती नात आहे. आपल्या या यशाने अदिती हिने कुटुंबासोबतच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. अदितीला ‘ग्लॅमरस फेस’ हा उपविजेतेपदाचाही बहुमान मिळाला, जो तिच्या आत्मविश्वासपूर्ण आणि मोहक व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आहे.
अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली अदिती ही एक उत्तम नृत्यांगना आणि होतकरू अभिनेत्री आहे. तिला फ्रेंच भाषेचे ज्ञान अवगत आहे. मेहनत, सातत्य व नवनवीन येत असलेल्या संकटांचा सामना करत व आई-वडिलांचे स्वप्न, तिची इच्छाशक्ती आणि कुटुंबाचा पाठिंबा या बळावर तीने हे यश मिळवले.
हा मुकुट माझ्या आई-वडिलांसाठी, कुटुंबासाठी आणि प्रत्येक स्वप्न पाहणार्या व्यक्तीसाठी आहे. त्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू पाहणे हेच माझे खरे यश आहे. अदिती आता ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा अमेरिका येथे होणार आहे. यामुळे वेंगुर्ल्याच्या कन्येचा प्रवास आंतरराष्ट्रीय व्यासपीठाकडे सुरू झाला आहे.