मालवण : मालवण तालुक्यातील आचरा-गाऊडवाडी शाळेतील पदवीधर शिक्षिका अन्य शाळेत कामगिरीवर नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्या पदवीधर शिक्षकेची पुन्हा आचरा गाऊडवाडी शाळेत नियुक्ती करावी. यासाठी आचरा येथील लोकप्रतिनिधी व पालक, ग्रामस्थ यांनी मालवण पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले.
उपस्थितांनी उपसभापती श्याम झाड यांना याबाबत निवेदन देत संपूर्ण माहिती दिली. सभापती, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपसभापती श्याम झाड यांनी दिली.
ग्रामविकास मंडळ आचरे-गाऊडवाडी पंचक्रोशी यांनी याबाबत प्रसिद्धिस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आचरा- गाऊडवाडी पूर्ण प्राथमिक शाळेत इ.१ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग असून शाळेत दोन उपशिक्षक व एक पदवीधर शिक्षक कार्यरत होते. मात्र मागील शैक्षणिक वर्षात शाळेत सातवी वर्ग नसल्यामुळे शाळेतील पदवीधर शिक्षिकेल्या अन्य शाळेत कामगिरीवर पाठविण्यात आले.सध्या नवीन शैक्षणिक वर्षात इ. ६ वी व ७ वीचा वर्ग सुरू झाला असूनही संबंधित पदवीधर शिक्षिकेला अद्याप मूळ शाळेत परत पाठविलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असून, पदवीधर शिक्षिका तातडीने आचरा गावडेवाडी शाळेत परत पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व पालकांनी प्रशासनाकडे सकारात्मक कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सरपंच जेरॉन फर्नांडिस, खरेदी -विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, जाकारीस फर्नांडिस, चंदन पांगे, जयंत पांगे, सुनील पेडणेकर यांसह ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. चर्चेदरम्यान उपसभापती श्याम झाड यांनी शिक्षण विभागातील अधिकारी यांना बोलावून माहिती जाणून घेतली. मुलांचे शैक्षणिक नुकसान होता नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सभापती, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे उपसभापती श्याम झाड यांनी स्पष्ट केले.