Achara Electricity Problem
कणकवली : आचरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी सोमवारी कणकवली येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची भेट घेऊन आचरा विभागातील वीज समस्या सोडवण्याची मागणी केली. त्याचबरोबर आचरा विद्युत सबस्टेशन येथे उपअभियंता, सहा.अभियंता व लाईनमन ही पदे तत्काळ भरण्याची मागणी करण्यात आली. त्यावर सौरभ माळी यांनी चार दिवसात उपअभियंता व सहा. अभियंता नेमण्याचे तसेच दोन दिवसात लाईनमनची नेमणूक करण्याचे आश्वासन शिवसेना पदाधिकार्यांना दिले. वारंवार खंडित होणारा वीज प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची ग्वाही श्री. माळी यांनी दिली.
आचरा विभागातील विविध वीज समस्यांमुळे नागरिक त्रस्त असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्यांनी मंगळवारी कणकवली येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची भेट घेऊन वीज समस्यांबाबत चर्चा केली. समस्या मार्गी न लागल्यास 24 जून रोजी आचरा तिठा येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी लेखी निवेदनाद्वारे दिला. याची दखल घेऊन कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी शिवसेना पदाधिकार्यांनी मांडलेल्या सर्व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
आचरा येथे वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामध्ये विद्युत वाहिन्यांवरील झाडांची कटिंग करणे, घरांवरील धोकादायक विद्युत वाहिन्या शिफ्टिंग करणे, जीर्ण पोल, विद्युत वाहिन्या बदलणे, आचरा विद्युत सब स्टेशन येथे उपअभियंता, सहायक अभियंता व लाईनमन यांची नेमणूक करणे, आऊट सोर्स कर्मचारी भरण्याचे आश्वासन सौरभ माळी यांनी दिले आहे.
ठाकरे शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक मंगेश टेमकर, विभाग संघटक पप्पू परुळेकर, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, आचरा महिला विभाग प्रमुख अनुष्का गावकर, पळसंब उपसरपंच अविराज परब, आचरा शहर प्रमुख माणिक राणे, युवासेना प्रमुख विद्यानंद परब, माजी सरपंच श्यामसुंदर घाडी, ग्रा.पं. सदस्या पूर्वा तारी, मच्छीमार नेते नारायण कुबल, अर्चन पांगे, परेश तारी, नंदू कांबळी, सचिन बागवे, श्रीकांत बागवे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.