कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा निवडक पाणथळ जागांवर प्लास्टिकमुक्त स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रविवारी घेण्यात आलेल्या या पाणथळ स्वच्छता मोहिमेमध्ये कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाने पाणथळ स्वच्छता मोहीम राबवून समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या स्वच्छता मोहिमेचा पहिला टप्पा पाट तलाव येथे पार पडला. या मोहिमेमध्ये पाट तलावातून जवळपास 200 किलो प्लास्टिक व इतर कचरा बाहेर काढण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापक, वनविभाग, देशपांडे फाऊंडेशन, वनशक्ती फाउंडेशन, पाट ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या संकलीत प्लास्टिक कचर्यावर परूळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रक्रिया करण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी 8 वा. या स्वच्छता मोहिमेस सुरवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पाट तलावाच्या काठावर व आजूबाजूच्या परिसरात स्वच्छतेचे काम सुरू केले. काही जणांनी पाण्यामध्ये साठलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल इत्यादी कचरा बाहेर काढला. तर काही विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक घोषवाक्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली.
वन अधिकार्यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता राखण्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले. देशपांडे फाउंडेशनने मोहिमेसाठी लागणार्या साहित्याचा (हँडग्लोव्हज, पिशव्या, मास्क इत्यादी) पुरवठा केला. पाट ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करत, भविष्यातही असे उपक्रम राबवण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याची तयारी दर्शवली.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. ही मोहिम केवळ एक स्वच्छता उपक्रम न राहता, पर्यावरण जपण्यासाठी एक सामाजिक चळवळ ठरावी, असे मत डॉ . योगेश कोळी यांनी व्यक्त केले. 11 मे रोजी दाबाचीवाडी येथील स्वच्छता मोहिमेच्या पुढील टप्पा सहभागी होण्याचे आवाहन केले. या स्वच्छता मोहिमेमध्ये शिक्षक डॉ. अनंत लोखंडे, प्रशांत केरवडेकर, कुडाळ वनविभागाचे सचिन पाटील, पाट सरपंच सौ. साधना परब, वनशक्ती फाउंडेशनच्या करिष्मा मोहिते, देशपांडे फाउंडेशनचे तेजस सावंत, सिद्धेश पालव व 40 विद्यार्थी सहभागी झाले होते.