आंबडोस (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) गावच्या प्रकाशिका नाईक हिची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. 
कोकण

सिंधुदुर्ग : आंबडोस गावच्या प्रकाशिका नाईकची भारतीय महिला क्रिकेट संघात निवड

रणजित गायकवाड

मालवण, पुढारी वृत्तसेवा : इंग्लंड अ महिला क्रिकेट संघाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात आंबडोस (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील प्रकाशिका प्रकाश नाईक हिची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी-20 महिला क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाला चॅम्पियनशिप मिळवून देण्यात प्रकाशिकाने महत्वाची भूमिका बजावली होती. तिच्या या चमकदार कामगिरीची दखल बीसीसीआयच्या महिला संघाच्या निवड समिती घेतली आणि प्रकाशिकाचा अष्टपैलू म्हणून संघात समावेश केला आहे.

सातत्यापूर्ण प्रभावी कामगिरी

प्रकाशिका ही शाळा स्तरापासून क्रिकेट खेळत आहे. कॉलेज स्तरावरही तिने मैदान गाजवले. त्यानंतर तिची भारताच्या 19 वर्षाखालील महिला संघात निवड झाली. ती मुंबई महिला संघाचीही उपकर्णधार होती. प्रकाशिका हिच्या सातत्यापूर्ण प्रभावी कामगिरी पाहून तिला मुंबई संघाची कर्णधार म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया टी-20 स्पर्धेत मुंबई संघाला चॅम्पियनशिप मिळाली. यामध्ये प्रकाशिकाने अष्टपैलू म्हणून चमकदार खेळी केली. तिच्या कामगिरीची दखल भारतीय महिला संघाच्या निवड समितीने घेतली.

29 नोव्हेंबरपासून इंग्लंड 'अ' विरुद्ध टी-20 मालिका

इंग्लंड 'अ' संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे. उभय संघांमध्ये वानखेडे स्टेडियमवर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना 29 नोव्हेंबर, दुसरा सामना 1, तर तिसरा सामना 3 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

स्लीप क्षेत्रातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक

प्रकाशिका ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी करते. ती आपल्या लेग स्पिनने प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकवण्यात पटाईत आहे. तसेच स्लीप क्षेत्रातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून तिची ओळख आहे. तिच्या निवडीने आंबडोस परिसरात आनंद व्यक्त होत आहे. प्रकाशिका हिच्या निवडीने आपल्या गावाचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचणार असल्याची भावना आंबडोस गावावासियांकडून व्यक्त होत असून यासाठी तिला शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT