गुहागर शहर : पारंपरिक ग्रामीण जीवनशैलीमध्ये शेती आणि गुरंढोरं यांची उपयुक्तता दिसून येत असे. एकमेकास पूरक अशी ही व्यवस्था होती. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करताना पूर्वी शेतीवरती जास्त भर दिला जात आहे. पूर्वी प्रत्येक घरात गुरे पाळली जात होती. त्यांना डिसेंबरनंतर गोठ्यातून बाहेर काढत ‘आवसा’ काढून त्यात बांधले जात होते. मात्र आता ग्रामीण भागात पशुधन कमी झाल्याने गुरांसाठीचा आवसा दिसणे दुर्मीळ झाले आहे. काही ठिकाणी या आवश्याला ‘कावणं’ असेही बोलले जाते.
पूर्वी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी गुरंढोरं, कोंबडी कुत्री असे प्राणी पाळले जात होते. शेतीला यांची गरज असायची. प्रत्येक शेतकऱ्याकडे घराशेजारी गोठा असायचा. या गोठ्यात पावसाळ्यात गुर बांधली जात होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यापासून शेतकरी आपल्या गुरांना बाहेर आवसा काढून त्यात बांधत असत. आवसा म्हणजेच झाडांच्या फांद्यांपासून भिंतीसारखे छत उभारून चार बाजूने बांधले जात असे. त्याला बांबूचा आधारसुद्धा दिला असे. आतमध्ये गुरांना बांधण्यासाठी आणि त्यांना वैरण टाकण्यासाठी गवाणी बनवलेली असे.
त्यानंतर गवताच्या वरंडी ठेवण्यासाठी आवसाच्या बाजूला कळकीच्या काटेरी आणि करवंद्याच्या फांद्यांचे कुंपण केले जात असे. हे गवत शेतीच्या मशागतीसाठी आणून ठेवले जात असे. त्याचबरोबर बाजूला शेणाच्या गोवरीसाठी माचली अशी आवसाची रचना असे. गुरांना एकाच जागी न बांधता जागा पालट करण्यासाठी त्यांना गोठ्यातून बाहेर काढले जायचे आणि पुन्हा पाऊस पडायच्या आधी त्यांना आवसात आणले जात होते. त्यानंतर गुरांना शेतकरी बांधून ठेवत होते.