रत्नागिरी

रत्नागिरी : चिपळुणातील कोसळलेल्या पुलाची तज्ज्ञ समितीकडून पाहणी

दिनेश चोरगे

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख चौक येथील कोसळलेल्या पुलाची चौकशी सुरू झाली आहे. बुधवारी (दि. 25) सायंकाळी त्रिसदस्यीय समितीने कोसळलेल्या पुलाच्या भागाची पाहणी केली. दि. 26 रोजी दिवसभर या प्रकरणी चौकशी करण्यासाठी तांत्रिक माहिती तसेच संबंधित यंत्रणांच्या बैठका आणि बोलणी सुरू केली आहे.

16 रोजी बहादूरशेख येथील निर्माणाधीन पुलाचे गर्डर कोसळले. या दुर्घटनेमुळे मोठी खळबळ निर्माण झाली. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी भल्या पहाटे पुलाची पाहणी करीत तज्ज्ञ अधिकार्‍यांची समिती पुलाच्या बांधकामाची चौकशी करून अहवाल देईल, असे जाहीर केले. त्यानुसार बुधवारी सायंकाळी तज्ज्ञ अभियंता व्ही. एन. हेगडे आणि विनय गुप्ता हे तज्ज्ञ अभियंता चिपळुणात दाखल झाले. सायंकाळीच त्यांनी बहादूरशेख येथे जाऊन कोसळलेल्या पुलाची पाहणी केली. आज दिवसभर त्यांनी कोंडमळा येथे ईगल कंपनीच्या कास्टिंग प्लांन्टला भेट दिली व त्या ठिकाणी गर्डर तयार होण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. तसेच ईगल कंपनीच्या कार्यालयात जाऊनदेखील या पुलाचा आराखडा, अंदाजपत्रक व अन्य तांत्रिक माहिती घेतली.

गर्डर कास्टिंग कसे केले जातात? याची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या शिवाय प्रत्येक टीमशी या द्विसदस्यीय समितीने चर्चा केली. कास्टिंग करणारे कर्मचारी, गर्डर लॉन्चिंग करणारे कर्मचारी, सुपरव्हिजन करणारी कंपनी, ईगलचे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता लक्ष्मीकांत जाधव, श्री. कुलकर्णी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT