खेड : येथील नगर वाचनालयाचा अस्तित्वासाठी लढा सुरू आहे. घटणारी वाचक संख्या आणि ग्रंथालय चालवण्यासाठी संचालकांची होणारी ओढाताण यामुळे वाचनालयाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागतिक पुस्तक दिनी तरी सरकारला खेड नगर वाचनालयाप्रमाणेच सुरू असलेले ग्रामीण भागातील अनेक ग्रंथालयांची आर्त हाक ऐकू जाणार आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो.
ग्रंथ हेच गुरू मानून ज्यांनी जीवन व्यतीत केले त्यांनी मानवी समाजाला दिशा दिली हा इतिहास आहे. परंतु आधुनिक काळात ग्रंथ संपदा सांभाळणाऱ्या ग्रामीण भागातील ग्रंथालयांची राज्यासह देशात दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानात आणि घटत्या वाचक संख्येत ग्रंथालये चालवणे दिवसेंदिवस कठीण बनू लागले आहे. कोकणातील खेड येथे दि.१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र दिनी स्थापन झालेल्या नगर वाचनालयाची अस्तित्वाची लढाई सुरू आहे. गेले ७८ वर्षे हे वाचनालय सुरू ठेवण्यासाठी येथील पुस्तक प्रेमी धडपड करत आहेत.
एका बाजूला २३ एप्रिल रोजी जगभर जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. यामागचा उद्देश म्हणजे वाचनाची आवड निर्माण करणे, पुस्तके आणि लेखक यांचं महत्त्व पटवून देणे, आणि साहित्य व बौद्धिक संपत्तीबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. महाराष्ट्र राज्यात ११ हजार ग्रंथालये आहेत. त्यांच्या वर्गवारीनुसार त्यांना वार्षिक ६ लाख रुपयेपर्यंत सरकारकडून अनुदान देखील दिले जाते मात्र, या अनुदानात तेथील ग्रंथपाल, शिपाई यांचा पगार, पुस्तक खरेदी, पुस्तकांच्या देखभाल दुरुस्तीला येणारा खर्च सांभाळणे या ग्रंथालयांना कठीण बनले आहे. खेड नगर वाचनालयात ३४ हजार पेक्षा जास्त पुस्तके असून त्यांना ठेवण्यासाठी उत्तम दर्जाची कपाटे देखील येथे उपलब्ध नाहीत. इमारत जुनी झाली असून या इमारती भोवती अनधिकृत दुकानांच्या रांगा उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पुस्तक प्रेमी नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रंथालयांना सरकार अनुदान देते मात्र ते अनुदानात ग्रंथपाल, शिपाई यांना पगार देण्यासाठी देखील पुरेसे नाही. त्यातच देखभाल दुरुस्ती, पुस्तक खरेदी यांचा देखील भार असतो त्यामूळे सरकारने वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नगर वाचनालयांना पुरेसे अनुदान व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मत खेड नगर वाचनालयाचे अध्यक्ष बाळाराम खेडेकर यांनी व्यक्त केले.
ग्रंथ आणि ग्रंथालय यांची गरज वाचनाची सवय लावणे, पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानप्राप्ती वाढवणे, बालकांपासून प्रौढांपर्यंत सर्वांमध्ये साहित्याची आवड निर्माण करणे यासाठी जेवढे आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त सुजान व सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी ग्रंथालय टिकणे व वाचन संस्कृती वाढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने कार्यरत ग्रंथालयांना हातभार द्यावा, असे मत शशांक सिनकर यांनी व्यक्त केले.