दापोली : चिपळूण येथील समर्थ भंडारी पतसंस्थेच्या दापोली शाखेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून त्यावर 2 लाख 90 हजार रुपयांचे सोने तारण कर्ज घेऊन पतसंस्थेची फसवणूक करणार्या एका महिलेविरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समर्थ भंडारी पतसंस्थेच्या दापोली शाखेत दि. 25 रोजी वनिता सुरेश केळकर (रा. खेर्डी) असे ओळखपत्र घेऊन एक महिला एका पुरुषासह तिचे सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्जासाठी आली होती. तिने आणलेले दागिने पतसंस्थेच्या अधिकृत सोनाराने तपासून ते सोन्याचेच असल्याचा अहवाल दिल्यावर तिचे 54 ग्रॅम 700 मिलीग्रॅम सोने तारण ठेवून तिला 2 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज या पतसंस्थेकडून देण्यात आले. कर्जाची रक्कम घेऊन ती महिला पतसंस्थेतून निघून गेली.
दरम्यान, नंतर याच पतसंस्थेच्या हर्णे शाखेत पुन्हा ती सोने तारण कर्ज घेण्यासाठी गेली. त्यासाठी तिने तिचे ओळखपत्र दिले. त्यावर सरिता नरेश तवसाळकर असे नाव होते व पत्ता पाळंदे असा होता. कागदपत्रे तपासणारा कर्मचारी हा पाळंदे येथील होता. त्याने त्या महिलेला तुम्ही पाळंदे येथे कोठे राहता, असे विचारले असता या महिलेने विठ्ठल मंदिराच्या मागे रहात असल्याचे त्याला सांगितले. तिचा संशय आल्याने त्या कर्मचार्याने दापोली शाखेतील पाळंदे राहणार्या कर्मचार्याकडे या महिलेविषयी विचारणा केली.
त्या कर्मचार्याने तिचा फोटो पाहून तिने काही वेळापूर्वी दापोली शाखेतून वेगळे नाव व पत्ता देवून सोने तारण कर्ज घेतले होते, असे सांगितले. यामुळे शंका आल्याने या महिलेने दापोली शाखेत ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सोनाराला बोलावून पुन्हा तपासणी केली असता ते खोटे असल्याचे आढळले.
काही काळ हर्णे शाखेतील कर्मचार्यांनी त्या महिलेला हर्णे शाखेतच दागिने तपासायचे असल्याचे सांगून थांबवून ठेवले होते. मात्र, त्या महिलेला आपण पकडले जाऊ याचा संशय आल्याने तिने हर्णे शाखेतून पोबारा केला. मात्र, तिच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेवून दापोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. संस्थेच्या दापोली शाखा व्यवस्थापकांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.