रत्नागिरी : जिल्ह्यातील 66 हजार 289 विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शासनाकडून 1 कोटी 92 लाख 6 हजार रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शाळेच्या पहिल्याच दिवशी एक गणवेश देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तालुक्याला जिल्हा परिषदेने हा निधी वर्ग केला आहे, परंतु आता शाळा सुरु होण्यासाठी फक्त 10 दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी गणवेश मिळेल की नाही, याबाबत शंका व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने दोन गणवेश देण्यात येतात. यापूर्वी शाळेच्या स्तरावर त्याचे नियोजन केले जात होते. शासनाकडून प्रति विद्यार्थी एका गणवेशासाठी अनुदान देऊन त्यातून शाळा विद्यार्थ्यांसाठी गणवेश तयार करून देत होते. मात्र गतवर्षी शासनाने थेट शासनस्तरावरूनच गणवेश देण्याचे नियोजन केले होते. शासनाने हा निर्णय घेतला खरा; मात्र त्यात सावळा गोंधळ झाला. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना गणवेश वेळेत मिळालाच नाही. जे गणवेश मिळाले, ते विद्यार्थ्याच्या मापाचे नव्हते. त्यामुळे सरकार टीकेचे लक्ष्य झाले.
शासनाला दुसरा गणवेश देण्यासाठी दिवाळीनंतर वेळ मिळाला. त्यातही गणवेशाचे कापड वेळेत आले नाही, परत शिलाईत वेळ गेल्याने विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश शाळेचे शैक्षणिक वर्ष संपता संपता मिळाला. त्यामुळे सरकारची पुरती नाचकी झाली. शासनाने यंदा प्रति विद्यार्थी एका गणवेशासाठी 300 रुपये अनुदान यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीकडे जबाबदारी सोपवली आहे. गणवेशाचे कापड, त्याची शिलाई याबाबत शाळा स्तरावरून कोटेशन घेऊन तयारी करण्याची सूचना शाळांना दिली आहे. शासनाकडून आलेले अनुदान शाळांना वर्ग करण्यात येत आहे. मात्र शाळा सुरू होण्यास 10 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे गणवेश वेळेत मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.