देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथे शुक्रवारी (दि.२५) बिबट्याचे दुर्मीळ पांढरे पिल्लू आढळून आले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिबट्याचे पांढऱ्या पिल्लू आढळून आले असावे, असे वनविभागामार्फत सांगण्यात येत आहे. हे पिल्लू मादी बिबट्यासोबत पुन्हा रानात निघून गेले असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावात बुधवारी काजू लागवडीसाठी झाडे तोडण्याचे काम सुरू होते. सकाळी झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर मजुरांना बिबट्याची दोन पिल्लं आढळून आली. त्यातील एक पिल्लू नियमित रंगाचे तर दुसरे पिल्लू पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे होते. या पिल्लांचे डोळे देखील उघडले नव्हते. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होईपर्यंत त्या पिल्लांची आई सोबत पुनर्भेट झाली बिबट्या मादीने पिल्लांना राना दुसऱ्या ठिकाणी नेले होते. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.