खेड : महाराष्ट्रातील अनेक भाग दुष्काळाच्या झळा सोसत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीत मात्र लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औद्योगिक वसाहतीतील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने अठरा तासांहून अधिक काळ पाणीगळती सुरूच राहिल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आहे.
एकीकडे पाणीटंचाईमुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) यंत्रणेतील कथित हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एमआयडीसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाईपलाईन दुरुस्तीचे काम करणारा ठेकेदार काम अर्धवट सोडून गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पाईपलाईन फुटल्यानंतर सलग अठरा तासांहून अधिक काळ पाणी वाहत असतानाही गळती रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित ठेकेदारासह या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, याबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी गेल्या अठरा तासांपासून गळती थांबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे काही कामगारांनी सांगितले. परंतु गळती रोखण्यासाठी आवश्यक साहित्य खेड येथे उपलब्ध नसल्याने रत्नागिरीहून मागवावे लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.