रत्नागिरी : सध्या उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कडक उन्हामुळे भूजल पातळी खालावत चालली आहे. जिल्ह्यातील पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. यावर्षी पहिला टँकर रत्नागिरीत सुरू झाला असून, शहरालगतच्या गावांना सध्या तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. एकूण पाच गावांतील 25 वाड्यांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. तब्बल 10 हजार ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. भौगोलिक परिस्थितीचे कारण सांगितले जात असले तरी पाणी साठवण्यासाठी शासकीय तसेच जनतेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यात अधिकार्यांची मानसिकताही महत्वाची ठरत आहे. जिल्ह्यात धरणांची संख्याही फारच कमी आहे. फेब्रुवारी, मार्च महिना उजडला की पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. यावर्षी पाऊस लांबल्याने पाणी टंचाईला थोडा उशीरा झाला.
जिल्ह्यात यावर्षी पहिलाच टँकर हा रत्नागिरी तालुक्यात धावला आहे. गतवर्षी लांजा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात पहिला टँकर धावला होता. रत्नागिरी तालुक्यातील शहरालगत असलेल्या पाच गावांतील 25 वाड्यांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. एकूण पाच टँकरने हा पुरवठा केला जात असून तब्बल 10 हजार 260 ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावं लागत आहे. शहरालगतच्या गावांना पाणी टंचाईची झळ सध्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे ही गंभीर बाब आहे.
चालु वर्षी जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडयाला नुकतीच मंजूरी मिळाली असून तब्बल 357 गावांतील 722 वाड्यांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी आहे. यावर्षी संगमेश्वर, खेड, चिपळूण, दापोली, लांजा, मंडणगड आणि रत्नागिरी या तालुक्यांना सर्वांधिक पाणी टंचाई जाणविण्याची शक्यता आहे.
शहरालगत असलेल्या शिरगाव गावातील राधाकृष्णनगर, स्वरुपानंद नगर, आझादनगर, नायाबनगर, अजमेरीनगर, लक्ष्मीनगर, प्रशांतनगर, साईभूमीनगर नाचणे, आदीनाथनगर, खेडशी गावातील नवाथे पॅराडाईज, श्रीनगर, एकतानगर, गणेशनगर, लक्ष्मीनारायण नगर, मथुरापार्क, सरस्वतीनगर, सौम्यापार्क, सोमेश्वर गावातील पाळंदेवाडी, गुरववाडी, सडामिर्या गावातील चौसोपीवाडी, गवाणवाडी, मधलावठार, खालचावठार, मिर्या बंदर, आनंदनगर आदी वाड्यांचा समावेश आहे.