रत्नागिरी जिल्ह्यात पाणीबाणी सुरू; 31 मार्चपासून कपात Pudhari File Photo
रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात पाणीबाणी सुरू; 31 मार्चपासून कपात

पहिला पाणी टँकर रत्नागिरीत धावला; भूजल पातळी खालावली

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : सध्या उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कडक उन्हामुळे भूजल पातळी खालावत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईला सुरुवात झाली असून, पहिला टँकर रत्नागिरी तालुक्यात धावला आहे. तालुक्यातील एका गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच खेड व संगमेश्वर तालुक्यातील काही गावांनी टँकरसाठी मागणी केली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. भौगोलिक परिस्थितीचे कारण सांगितले जात असले तरी पाणी साठवण्यासाठी शासन तसेच जनतेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यात अधिकार्‍यांची मानसिकताही महत्त्वाची ठरत आहे. जिल्ह्यात धरणांची संख्याही फारच कमी आहे. फेब्रुवारी, मार्च महिना उजडला की पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या वर्षी पाऊस लांबल्याने पाणीटंचाईला थोडा उशीरा झाला. जिल्ह्यात या वर्षी पहिलाच टँकर हा रत्नागिरी तालुक्यात धावला आहे. गतवर्षी लांजा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात पहिला टँकर धावला होता. यावर्षी रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावांतील काही वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच खेड व संगमेश्वर तालुक्यातील काही गावांनी पाण्यासाठी टँकरची मागणी केल्याचे समजते.

चालू वर्षी जिल्ह्याचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडयाला नुकतीच मंजुरी मिळाली असून तब्बल 357 गावांतील 722 वाड्यांचा यामध्ये समावेश आहे. यासाठी 9 कोटी 49 लाख 70 हजार रुपयांची आवश्यकता आहे. या वर्षी संगमेश्वर, खेड, चिपळूण, दापोली, लांजा, मंडणगड आणि रत्नागिरी या तालुक्यांना सर्वांधिक पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

शीळ धरणात 1.863 द.ल.घ.मी. जलसाठा

शिमगोत्सव आणि रमजान उपवासाचे दिवस सुरू असल्याने गेल्या सोमवारी रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला नाही. मात्र आता येत्या सोमवारपासून (31 मार्च) प्रत्येक सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सध्या रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरणात आणखी तीन ते साडेतीन महिने पुरेल इतका पाणीसाठा आहे. शहराला प्रती दिन 15 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.

रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरणात मंगळवारी 1.863 दशलक्ष घनमीटर जिवंत पाणी साठा आहे. रत्नागिरीतील सुमारे 10 हजार 400 नळ जोडण्या असून दररोज 15 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यानुसार हा पाणीसाठा तीन ते साडेतीन महिने पुरणारा आहे. पावसाळा नियमित सुरू होईपर्यंत हा पाणीसाठा पुरणारा असला तरी उन्हाळा कडक झाला आहे.

कडक उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे पाणीटंचाईचा धोका ओळखून पाणी कपातीचा निर्णय रत्नागिरी नगर परिषदेकडून दरवर्षी घेतला जात असतो. त्यानुसार

मागील सोमवारपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु शिमगोत्सव आणि रमजान महिना सुरु असल्याने मागील सोमवारी पाणीपुरवठा सुरुच ठेवण्यात आला होता. परंतु, आता 31 मार्चच्या सोमवारपासून पुढील दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे रत्नागिरी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT