Uday Samant File photo
रत्नागिरी

Uday Samant : वाटद एमआयडीसी ग्रामस्‍थांना विश्‍वासात घेऊनच उभारणार

पालकमंत्री उदय सामंत यांचीही पूर्णपणे प्रदूषणविरहित व स्थानिकांना रोजगार देणारा प्रकल्प आणण्याची भूमिका

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यातील वाटद एमआयडीसीसंदर्भात जमिनीच्या भूसंपादनावरून सध्या मोठी खळबळ उडाली असली तरी या प्रकरणाशी 'अंबानी डिफेन्स'चा कोणताही संबंध नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्थानिकांचा तीव्र विरोध आणि उलटसुलट चर्चांना उधाण आलेले असतानाच प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही अंतिम निर्णय घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या दोन-तीन दिवसांत प्रकल्प विरोधकांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली जाणार असून पालकमंत्री उदय सामंत यांनीही त्या ठिकाणी पूर्णपणे प्रदूषणविरहित आणि स्थानिकांना रोजगार देणारा प्रकल्प आणण्याची भूमिका घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी वाटद परिसरातील जमीन भूसंपादनासाठी प्रशासनाने अधिसूचना जारी केली. या घोषणेमुळे गावात विविध चर्चांना सुरुवात झाली आणि हा प्रकल्प थेट 'अंबानी डिफेन्स'चा असल्याच्या जोरदार चर्चा पसरल्या. मात्र, प्रशासनाने या वृत्ताला स्पष्ट शब्दांत पुष्टी नाकारत या कंपनीशी या भूसंपादनाचा दूरदूरपर्यंत संबंध नसल्याचे जाहीर केले. यामुळे या जमिनीवर नेमका कोणता प्रकल्प येणार आणि त्यामुळे आपल्या जमिनींचे काय होणार, याविषयी ग्रामस्थांमध्ये अजूनही संभ्रम आणि उत्सुकता कायम आहे.

जिल्‍ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणात लक्ष घातले असून वाटदमध्ये पर्यावरणाला कोणतीही बाधा पोहोचणार नाही आणि स्थानिकांच्या हिताचे रक्षण होऊन रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असाच प्रकल्प आणण्यावर त्यांचा कटाक्ष आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांचे आक्षेप, चिंता आणि मागण्या समजून घेण्यासाठी प्रशासनाने आता थेट संवादाचा मार्ग पत्करला आहे. याच अनुषंगाने दोन-तीन दिवसांत ग्रामस्थांसोबत विशेष बैठक आयोजित केली जाणार असून या दरम्यान त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची स्थानिक पातळीवरील परिस्थिती व कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेणारा सविस्तर अहवाल पोलिस विभागाने प्रशासनाला सादर केला आहे. एकीकडे भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया, दुसरीकडे अंबानी डिफेन्सशी असणारा संबंध स्पष्टपणे नाकारणे आणि तिसरीकडे पालकमंत्र्यांचा प्रदूषणविरहित प्रकल्पावरील आग्रह, या सर्व घडामोडींमुळे सध्या वाटदच्या भविष्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून येत्या दोन-तीन दिवसांमधली बैठक या वादावर काय तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT