आंबा, काजू, फणस, कोकमपासून बनली ‘व्वा ईन’ 
रत्नागिरी

आंबा, काजू, फणस, कोकमपासून बनली ‘व्वा ईन’

13 वर्षांच्या अथक प्रयत्नांना यश : लवकरच बाजारात येणार

पुढारी वृत्तसेवा
समीर जाधव

चिपळूण : सर्वांनाच फक्त द्राक्षापासून वाईन तयार केली जाते हे माहिती आहे; पण कोकणातील आंबा, काजू, करवंद, जांभूळ, फणस, चिंच, आवळा, चिकू, कोकम इतकेच काय, कोणत्याही फळापासून वाईन बनली तर..! हो, हे शक्य केले आहे दापोली तालुक्यातील कोळथरे येथील माधव महाजन यांनी. तब्बल 13 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांनी कोकणातील फळांपासून वाईन तयार केली आहे. लवकरच कोकणची ही ‘व्वा ईन’ बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, फळांचे नैसर्गिक गुण व पोषक द्रव्ये या वाईनमध्ये असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे.

गेली अनेक वर्षे माधव महाजन निर्मितीचा

प्रयोग करीत होते. सुरुवातीच्या काळात शासनाची त्याला परवानगी नव्हती. पाच-दहा लिटरमध्ये? ? हे प्रयोग सुरू केले. तब्बल 13 वर्षे वेगवेगळ्या प्रकारची वाईन त्यांनी तयार केली. सुरुवातीच्या काळात येणार्‍या पर्यटकाला किंवा कोण मागेल त्याला अगदी मोफत ती दिली. त्याची चव कशी आहे? किंवा आस्वाद असा आहे? याच्या चाचण्या घेतल्या. नंतर तर लोक विकत मिळेल का, असे विचारू लागले. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात वाईन बनविण्याचा निर्णय घेतला आणि दुसर्‍या बाजूला शासनाची मंजुरी मिळावी, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावादेखील सुरू केला.

कोकणात दरवर्षी वेगवेगळी फळपिके येतात. मात्र, फळप्रक्रियेअभावी ती फुकट जातात. यामध्ये आंबा, काजू, जांभूळ, करवंद, आवळा, कोकम अशा अनेक फळांचा समावेश असतो. अनेकदा कवडीमोल भावात बाहेर गावचे व्यापारी ती फळे खरेदी करतात. कधी आंबे कॅनिंगला द्यावे लागतात. त्यामुळे शेतकर्‍याला कष्ट करून फायदा मिळत नाही. कवडीमोल भाव मिळतो. म्हणून राज्य शासनाने या फळांपासून वाईननिर्मितीला परवानगी द्यावी, यासाठी अनेक वर्षांची मागणी होती. शासनाचे वाईन धोरण हे केवळ द्राक्षाच्या वाईनसाठीच तयार झालेले होते. त्यामुळे कोकणातील फळांपासून वाईननिर्मितीला मोठा अडथळा होता.

अनेकवेळा याबाबत महाजन यांनी मंत्रालयस्तरावर पाठपुरावा केला. मुख्यमंत्री मनोहर जोशींपासून आजपर्यंत अनेक मंत्र्यांच्या गाठीभेटी घेत त्यांनी हा प्रश्न मांडला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडेदेखील याबाबत पाठपुरावा केला. मात्र, त्याला यश आले नव्हते. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीमध्ये आले असताना, माधव महाजन यांनी चिपळूणचे आ. शेखर निकम यांच्या माध्यमातून नवीन वाईन धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. अखेर याची दखल घेत राज्य शासनाने नवीन वाईन धोरण जाहीर केले. पूर्वीच्या काळी वाईननिर्मिती करण्यासाठी शून्य ते दोन लाख लिटर उत्पादन असेल तर वाईननिर्मितीचा परवाना मिळत होता. त्यासाठी कोट्यवधीचे भांडवल आवश्यक होते. त्या माध्यमातून घरगुती स्वरूपात किंवा लघू उद्योग स्वरूपात वाईननिर्मिती करणे शक्य नव्हते. या मुद्द्यावर बोट ठेवत महाजन यांनी शासनाचे लक्ष वेधले आणि आता नव्या वाईन धोरणानुसार, 10 हजार लिटरपासून वाईननिर्मिती उद्योगाला परवानगी मिळाली आहे. हेच लक्षात घेऊन महाजन यांनी कोकणची ‘व्वा ईन’ बाजारात आणली आहे.

यासंदर्भात बोलताना महाजन म्हणाले, मुळात वाईन ही दारू नसून ती एक फळप्रक्रियाच आहे. त्यामुळे वाईनला दारूचे नियम न लावता ती फळप्रक्रिया उद्योगात बसवावी, म्हणजे कोकणातील फळांचे सोने होईल. खरे तर वाईन हे एक पौष्टिक पेय आहे. मात्र, तिला दारू म्हणणे म्हणजे फळ उत्पादक शेतकर्‍यांवर व उद्योजकांवर केलेला अन्यायच आहे. त्यामुळे शासनाने यासंदर्भात फळ उत्पादक व वाईन उत्पादकांचे म्हणणे ऐकून घेणे नितांत गरजेचे आहे.

अशी बनते वाईन...

मुळात 9 ते 12 टक्के इतके अल्कोहोल विविध आयुर्वेदिक औषधे अर्थात आसवे व आरिष्टव यामध्ये असते. ‘द्राक्षासव’ या औषधामध्येदेखील 9 ते 12 टक्के अल्कोहोल असते. त्यामुळे वाईन हा एक आसवाचाच प्रकार आहे. वाईनमध्ये त्या-त्या फळांची पोषणमूल्ये कायम शिल्लक असतात. कोणत्याही फळांच्या रसाला ईस्ट लावले की, 20 ते 25 दिवसांत फर्न्मेटेशन चालू राहते. त्यानंतर फळांच्या रसातील साखरेचे रूपांतर अल्कोहोलमध्ये होऊन वाईन बनते. त्यामुळे वाईन पिणे म्हणजे फर्मेन्टेड ज्यूस पिणे आहे. ही वाईन अनेक दिवस किंवा अनेक वर्षेही टिकते. जीवाणू हे अल्कोहोल बनवीत असतात. 13 ते 14 टक्के अल्कोहोल बनले की, हे जीवाणू त्यात जगू शकत नाहीत. मात्र, फळांचे अनेक गुणधर्म या वाईनमध्ये असतात. परंतु, दारूमध्ये पोषणमूल्ये येत नाहीत. फळांच्या रसाला फर्मेन्टेड केले म्हणजेच भट्टीवर न चढविता जे नैसर्गिक अल्कोहोल तयार होते त्याला नैसर्गिक रंग, स्वाद व पोषणमूल्ये असतात. म्हणून वाईन हे पौष्टिक पेय आहे. म्हणूनच महाजन यांनी वाईनच्या बाटलीवर ‘पौष्टिक पेय’ असा नामोल्लेख केला आहे.

वाईनमध्ये अनेक पोषक द्रव्ये

वाईनसंदर्भात तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी महाजन यांनी चर्चा केली आणि त्यावेळी वाईनमध्ये पोषक द्रव्ये असतात, असा दावा केला. त्यानंतर पुणे येथील एका शासकीय प्रयोगशाळेत वाईन तपासून घेतली. काजू बोंडे, करवंद, जांभूळ, फणस या चार प्रकारच्या वाईनची प्रयोगशाळेत तपासणी केली. या वाईनमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न भरपूर प्रमाणात असल्याचे आढळून आले. म्हणूनच वाईन ही पौष्टिक आहे, हे स्पष्ट झाले. तो फर्मेन्टेड फ्रूट ज्यूस आहे. त्यामध्ये फळांची सर्व पोषणमूल्ये आहेत. वाईन म्हणजे दारू नव्हे हे यातून स्पष्ट होते, असे महाजन विश्वासाने सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT