रत्नागिरी : मान्सूनपूर्व पावसामुळे घाटमाथ्यावर भाज्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा परिणाम कोकणातही जाणवू लागला आहे. रत्नागिरीमध्ये टॉमेटोचे दर 60 रुपये तर फ्लॉवर, ढबू मिर्चीचे दर 120 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.
मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत अवकाळी आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणसह महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले होते. त्याचा परिणाम आता भाजीपाला पिकांवर झाला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे भाज्यांचे नुकसान झाले आहे. कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो. भाजीपाल्याचे नुकसान झाल्यामुळे त्नागिरीमध्येही भाज्यांचे दर वाढले आहेत. कोथिंबीर 30 रुपये पेंडी पाऊस पडण्यापूर्वी 30 रुपये किलो असणारे टॉमेटोचे दर 60 रुपयांवर पोहोचले आहेत.
भोपळीमिर्ची आणि फ्लॉवरही 120 रुपयांच्या घरात गेले आहेत. मिरची, कोथिंबीर यांचे दरही वाढले आहेत. मेथी 30 रुपये झाली आहे. कोथिंबीर आठवडा बाजारात तिस रुपये पेंडीने विकली जात होती. कांदेही 25 ते 30 रुपये किलो झाले आहेत. अन्य भाजांचे दरही मोठ्याप्रमाणात वाढले असून, जवळजवळ दुप्पट झाले आहेत.