चिपळूण : येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस्च्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी भव्य कृषी महोत्सवाचे दि. 5 ते 9 जानेवारीदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण न.प.च्या स्वा. सावरकर मैदानावर सोमवारी सकाळी 10 वा. या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटक म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.
पाच दिवस वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन खुले राहणार असून पाचही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री उदय सामंत, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, तसेच गृह राज्यमंत्री योगेश कदम, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, आ. निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल हातेकर, माजी आमदार डॉ. विनय नातू, चिपळूणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याच दिवशी भाजप नेते प्रशांत यादव यांचा 51 वा वाढदिवस असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. दि. 6 जानेवारी रोजी सकाळी 8 वा. जास्त दूध देणारी गाय व म्हैस स्पर्धा होईल. 10 वा. पशुधन स्पर्धा, सायंकाळी 5 वा. विशेष जनावर प्रदर्शन शो, सायं. 6 वा. हरिपाठ, रात्री 8 वा. विठ्ठल नामाचा जयघोष - वारी सोहळा संतांचा हा कार्यक्रम होईल. दि. 7 रोजी सकाळी 10 वा. आरोग्य शिबिर, 11 वा. बांबू लागवड आणि त्याचा वापर या विषयी कार्यशाळा होईल. सायंकाळी 5 वा. कॅट शो, 6 वा. कीर्तन, रात्री 8 वा. मावळा - स्वराज्याचे शिलेदार हा मावळ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारा कार्यक्रम सादर होईल.
दि. 8 रोजी सकाळी 10 वा. गोड पाककला स्पर्धा. 11 वा. कोकण कपिला गाय कार्यशाळा, सायं. 5 वा. डॉग शो, 6 वा. भजन, तर रात्री 8 वा. अवधूत गुप्ते यांच्या गाण्यांचा लाईव्ह शो होईल. दिनांक 9 रोजी सकाळी 10 वा. तिखट पाककला स्पर्धा, सायं. 5 वा. विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ होईल. रात्री 8 वा. या महोत्सवाचे आकर्षण असणारा ‘आवारा हूँ’ हा कार्यक्रम होईल. अशोक हांंडे निर्मित राज कपूर यांच्या जीवनावरील गाण्यांचा हा कार्यक्रम या महोत्सवात सादर होणार आहे.
या कृषी महोत्सवाला शालेय विद्यार्थी, शेतकरी, कृषी महाविद्यालये आणि स्थानिकांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन चिपळूण नागरी सह. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, वाशिष्ठी मिल्कच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव व चेअरमन प्रशांत यादव यांनी केले आहे.