वैभववाडी : वैभववाडी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची तसेच स्थानक परिसराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. याचा फटका दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना व वाहनचालकांना बसत आहे. आता पावसाळा तोंडावर आला असून तत्पूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करावे,तसेच रेल्वे स्थानक परिसरातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
वैभववाडी रेल्वे स्थानक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. वैभववाडी तालुक्यासह देवगड, कणकवली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील हजारो प्रवासी दररोज या स्थानकाचा वापर करतात. मात्र स्थानकाकडे जाणाऱ्या सुमारे ५०० मीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी डांबर उखडून खडी बाहेर आली आहे. त्यामुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक तसेच चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागतेे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरू शकते.रेल्वे स्थानक परिसराची अवस्था समाधानकारक नसून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची समस्या निर्माण होत आहे. प्रवाशांना सामान घेऊन चालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग प्रवाशांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानकांच्या परिसरात चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तेथील रस्ते, पार्किंग व्यवस्था आणि स्थानक परिसर सुस्थितीत आहे. मात्र वैभववाडी रेल्वे स्थानकाच्या बाबतीत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी संबंधित प्रशासन, रेल्वे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी करून रस्त्याचे डांबरीकरण, खड्डे बुजविणे तसेच स्थानक परिसराची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक व प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे. अन्यथा पावसाळ्यात या समस्येची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.