रत्नागिरी : कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून चुलत मामाने भाच्याच्या छातीत सुतारकामासाठी वापरणारी आरी खुपसून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी मिरकरवाडा-खडप मोहल्ला येथे दुपारी 3 ते 3.30 वा.च्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी पळून जाणार्या दोन संशयितांना रेल्वे स्टेशन येथून, तर एकाला घटनास्थळावरून ताब्यात घेतले.
प्रिन्स मंगरू निषाद (वय 19 रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून निरज निषाद आणि त्याचे साथीदार अनुज चौरसिया व रविकुमार भारती (सर्व रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) या तिघांना शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे एका मोबाईल शॉपीचे काम सुरू होते. गोरखपूर येथील 4 कामगार तिथे फर्निचरचे काम करत होते. त्यामध्ये मयत प्रिन्स निषाद व त्याचा मामा व अन्य दोन कामगार होते.
शनिवारी दुपारच्या वेळेस काम सुरू असताना प्रिन्स आणि त्याचा मामा यांच्यात प्रिन्स सतत मोबाईलवर बोलत असतो, या रागातून वाद झाला. या वादातून हाणामारी झाली. संतप्त झालेल्या मामाने सुतार कामासाठी वापरणारी आरी प्रिन्सच्या छातीत खुपसली. हा घाव इतका वर्मी होता की प्रिन्सचा जागीच मृत्यू झाला.
या हल्ल्यानंतर नीरज निषाद आणि अनुज चौरसिया हे दोघे संशयित आरोपी घटना स्थळरावरून पसार झाले. या सर्व प्रकाराने घाबरलेल्या रविकुमार भारतीने आजुबाजुच्या नागरिकांना खूनाची माहिती दिल्यांतर त्यांनी त्याला ‘112’ ला फोन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे रविकुमारने फोन केल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रविकुमाने पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपीचे मोबाईल नंबर पोलिसांना दिले. त्यावरून पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले त्यावेळी ते रेल्वे स्टेशनला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने एक पथक तिथे पाठवले. रेल्वेतून पाळण्याच्या तयारीत असलेल्या संशितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून प्रिन्सचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. खुनाची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश माईनकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे आणि जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.