चिपळूण ः जो कोणी स्वबळाची भाषा करत आहे, त्यांनी खरोखरच स्वबळावर लढावे; मग काय करायचे ते आम्ही ठरवू. परंतु, आम्ही महायुतीचा धर्म पाळण्याचे ठरवले आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्यास सांगितले आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे होईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळुणातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शहरातील बहादूरशेख नाका येथील पुष्कर सभागृहात शिवसेना पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यामध्ये ग्रामीणसह शहरी भागात शिवसेनेची ताकद आहे. तरीही आम्ही महायुतीसाठी आग्रही आहोत. मुख्यमंत्र्यांबाबत अनादर होईल, असे आम्ही कधी बोललो नाही. चिपळुणातील अनेकजण स्वबळाची भाषा करत आहेत. त्यांनी तसे जाहीर करावे. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांनाही उत्तर द्यावे. शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. विधानसभा निवडणुकीतदेखील शिंदे सेना अॅक्टिव्ह झाली नसली, तर त्याची कल्पना सर्वांना आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांत संघटना मजबूत कशी होईल, याची दक्षता घ्यावी. दुसर्याच्या गावात अथवा भागात डोकावू नये. आपण नम्रतापूर्वक पक्ष वाढवला पाहिजे. हीच भूमिका आपल्या नेत्यांपासून सर्वांची आहे. त्यामुळे आपण कोणी काही बोलले म्हणून आपण पक्ष वाढवायचे थांबायचे नाही. आपल्या पक्षाचे अस्तित्व मतांमध्ये कसे परिवर्तन होतील, यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत
राज्यातील तीन कोटी महिलांना दर दीड हजार मिळत आहेत, याचे श्रेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यावे लागेल असे सांगून त्यांनी अनेक योजना आणल्याचे सांगितले. या योजना लोकांपर्यत पोहोचवण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीकडून मुस्लीम लोकांच्या डोक्यात विष कालवण्याचे काम केले जात आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साबीर शेख सारख्या मुस्लीम नेत्यास मंत्रीपद दिले. त्याचपद्धतीने शिवसेना काम करत आहे. यावेळी शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख संदेश आयरे, रूपेश घाग, निहार कोवळे, दिलीप चव्हाण, शशिकांत चाळके, सिद्धार्थ कदम, संदीप सावंत, रश्मी गोखले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.