Uday Samant 
रत्नागिरी

Uday Samant : महानगरपालिकांत शिवसेनेचे 400हून अधिक नगरसेवक

उद्योगमंत्री सामंत ः एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर मोहोर

पुढारी वृत्तसेवा

रत्नागिरी : शिवसेनेतील उठावानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांचे लक्ष या निकालांकडे लागले होते. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत महायुतीला मोठे यश मिळवून दिल्याचे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचे सुमारे सव्वाचारशेहून अधिक नगरसेवक निवडून आले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत शून्यावरून थेट 29 जागा जिंकणे, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीवर पूर्ण वर्चस्व मिळवणे, हा शिंदे यांच्या लोकप्रियतेचा विजय आहे. विशेषतः ज्या शहरांमध्ये पक्षाचे अस्तित्व नव्हते, अशा पिंपरी-चिंचवडमध्ये सहा, तर नागपूर, चंद्रपूर आणि अकोला यांसारख्या शहरांतही पक्षाचे नगरसेवक स्वबळावर निवडून आले आहेत. नवी मुंबईत पक्षाने 40 चा आकडा पार केला असून, सांगली-मिरज-कुपवाडमध्ये तर महापौर ठरवण्याची ताकद शिवसेनेने निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले. यूबीटी गटावर टीका करताना सामंत म्हणाले की, त्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यामुळेच जनतेने त्यांना नाकारले. मुंबईत मराठी अस्मितेचा आव आणणाऱ्यांना मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने कौल दिला आहे. छत्रपती संभाजीनगरचे नामकरण करण्याला विरोध करणाऱ्यांना तिकीट देऊन यूबीटीने आपली दुटप्पी भूमिका स्पष्ट केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मनसेच्या संदर्भात बोलताना सामंत यांनी खंत व्यक्त केली. या निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसला असून युबीटीने मनसेच्या मतांचा वापर स्वतःचे उमेदवार निवडून आणण्यासाठी केला, परंतु मनसेच्या उमेदवारांना मदत केली नाही. राज ठाकरे यांच्या संवेदनशील स्वभावाचा फायदा युबीटीने घेतल्याचेही ते म्हणाले. ज्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार कमी पडले, त्याचप्रमाणे आत्मपरीक्षण करून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत केली जाईल, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. शेवटी, हा विजय म्हणजे महाराष्ट्रातील महानगरांनी शिंदे यांच्या नेतृत्वाला दिलेली मोठी मान्यता असल्याचे सांगत त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT