रत्नागिरी : प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची दोन दिवसात संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक गावची पाणी टंचाई परिस्थिती काय आहे, याचा तालुकानिहाय अहवाल सादर करावा, विंधन विहिरी खोदण्यासाठी प्राधान्याने सुरुवात करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यांनी टंचाईमधून केलेल्या कामाचा सर्वप्रथम आढावा घेतला. त्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी गावस्तरावर भेट दिली पाहिजे. काम झाले आहे किंवा नाही याची खातरजमा केली पाहिजे. शंभर टक्के अधिकाऱ्यांनी प्रॅक्टीकली काम केले पाहिजे. निवासीउपजिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसात प्रातांधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांची बैठक घ्यावी.याचा तालुकानिहाय अहवाल सादर करावा. पाणी टंचाई दूर करण्यासाठी खनिकर्ममधून निधी द्यावा.प्राधान्याने विंधन विहिरी खोदण्यावर भर द्यावा., असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, जि. प. सदस्य बाबू म्हाप, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता मयुरी पाटील आदी उपस्थित होते.