रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद व सर्वच पंचायत समित्यांमध्ये महायुतीला शंभर टक्के यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच चिपळूणमध्ये राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी जि. प. व पं.स.तिच्या उमेदवारांची पहिली यादीही सामंत यांनी जाहीर केली.
रत्नागिरी दौऱ्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाओस दौऱ्यावर जाण्यापूर्वी पत्रकार परिषद घेत जिल्हा परिषदेसाठी रत्नागिरी, संगमेश्वर व गुहागरमधील काही गटांच्या उमेदवारांची तर रत्नागिरी पंचायत समितीमधील काही गणांमधील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
रत्नागिरी तालुक्यातून पावस गटामधून जिजाऊ संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या ॲड. महेंद्र मांडवकर यांना शिवसेनेमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. रत्नागिरी तालुक्यात खेडशी गटामधून हर्षदा भिकाजी गावडे, शिरगाव गटामधून श्रद्धा दीपक मोरे, गोळप गटामधून नंदकुमार ऊर्फ नंदा मुरकर, खालगाव गटातून शिवसेना तालुकाप्रमुख महेश ऊर्फ बाबू म्हाप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यात दहापैकी पाच जागांवर उमेदवार निवड झाली आहे. तर संगमेश्वरमध्ये कसबा गटातून माजी जि.प. अध्यक्षा रचना राजेंद्र महाडिक, मुचरी गटातून माधवी गिते, गुहागर तालुक्यात वेळणेश्वर गटामधून नेत्रा ठाकूर, पडवे गटातून माजी उपाध्यक्ष महेश नाटेकर यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत.
रत्नागिरी पंचायत समितीसाठी हातखंबा गणातून विद्या बोंबले, देऊड गणातून नेहा गावणकर, केल्येमधून सुमेश आंबेकर तर नाणीजमधून डॉ. पद्मजा कांबळे, साखरतरमधून परेश सावंत यांना उमेदवारी पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केली आहे.
उमेदवारी जाहीर करताना सामंत म्हणाले की, खेड विधानसभा मतदार संघातील उमेदवार राज्यमंत्री योगेश कदम हे लवकरच जाहीर करतील असे सांगितले. भाजपाचा सन्मान ठेवून त्याठिकाणी जागा सोडल्या जाणार आहेत. शिवसेना-भाजप युतीबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबरच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीसोबत चिपळूणमध्ये मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली तर संगमेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी सोबत महायुतीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. याबाबत चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा झाली आहे. लांजा-राजापूरमधील उमेदवार लवकरच जाहीर केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.