रत्नागिरी : मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटच्या जी. आर. बाबत कोकणातील कुणबी समाजामध्ये संभ्रमावस्था आहे. याबाबत कुणबी समाजाकडून आंदोलनदेखील आहे. या पार्श्वभूमीवर शासन म्हणून कुणबी समाजाच्या ज्या काही मनात शंका आहेत. त्या दूर करण्यात येणार आहेत. यासाठी मुख्यमंत्री यांच्याबरोबर समाजाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोकणात कुणबी समाजावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, असे पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गॅझेट संदर्भात कुणबी समाजाच्या मनात अनेक शंका आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील समाजाच्या नेत्यांबरोबर एक बैठक ही आयोजित करण्यात आली होती, असे सांमत यांनी सांगितले. जोपर्यंत त्यांच्या मनातील शंका दुर होत नाही तोपर्यंत शासन म्हणून आम्ही त्यांच्यासोबत असू येत्या काही दिवसात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासेाबत बैठकही आयोजित करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत कुणबी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असे सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात शिंदे समिती स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत 363 मराठा-कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी 15 जणांनी दाखले मिळावे, यासाठी जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप एकही दाखला जात पडताळणीकडून आला नाही, असे स्पष्ट केले आहे.