रत्नागिरी : विकास हाच आमचा धर्म आहे. समाजाचे आणि धर्माचे राजकारण हे विकासापेक्षा मोठा समजणारा कार्यकर्ता मी नाही. कुठच्या समाजाचा माणूस आहे, हे न बघता त्याच्या अडीअडचणीला धावून जाणे आणि विकासकामं करणे हाच आमचा धर्म आहे, असे सांगत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 2 तारखेला धनुष्यबाणाच्या निशाणीवर एकतर्फी मतदान करण्याचे आवाहन केले.
रत्नागिरीतील प्रभाग क्र. 14 व 15 मधील प्रचार सभेत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ना. सामंत यांनी जातीयवादावर सडकून टीका केली. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसांमध्ये होणार्या जाती-धर्माच्या राजकारणावर त्यांनी नाराजी व्यक्त करत, काही मंडळी जाणूनबुजून गैरसमज पसरवत आहेत, याला बळी पडू नये, असे आवाहन केले.
आम्ही ज्या धर्मातून मोठे झालो, त्यात दुसर्या धर्माचा तिरस्कार करायला सांगितला नाही. तसेच मुस्लिम धर्मातही सांगितलेले नाही, असे ते म्हणाले. दिल्लीतून किंवा मुंबईतून कोणी काही वाईट सांगत असेल, त्यापेक्षा तुमच्याबरोबर 25-25 वर्षे काम केलेल्या उदय सामंतचा विचार करा, असे आवाहन त्यांनी केले. मिरकरवाड्याच्या विकासाचा दाखला देताना गेल्या 25 वर्षांत आपल्या शिवाय कोणी एक रुपया खर्च केला नसल्याचे सांगत त्यांनी मत्स्य व्यवसायाच्या कामांचा उल्लेख केला.
मिरकरवाड्याच्या जेटीवर हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने मच्छीमारी करत आहेत म्हणून 80 कोटी रुपयांच्या तिसर्या टप्प्याला मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. महिला मच्छीमार भगिनींच्या मासे सुकवण्याच्या जागेचा प्रश्नही 3 तारखेनंतर मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
कब्रस्तानच्या नोंदीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वर्षानुवर्षे आपलीच भगिनी नगरपालिकेत निवडून पाठवूनही कब्रस्तानची नोंद झाली नाही, पाखाड्या झाल्या नाहीत, पण 3 तारखेला शिवसेनेचा नगराध्यक्ष बसल्यानंतर पुढच्या 15 दिवसांत कब्रस्तानची नोंदणी करण्यापासून सगळ्या समस्या दूर होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
देशातील पहिले क्रुज टर्मिनल महाराष्ट्रात साडेतीनशे कोटी रुपये खर्चून होत आहे. हे पहिले क्रुज टर्मिनल भगवती बंदरच्या किनार्यावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख यशवंत जाधव, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राजू महाडिक, भाजपचे अॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष मामा मयेकर, शिल्पा सुर्वे, बंटी कीर, निवेदिता कळंबटे आदी उपस्थित होते.