रत्नागिरी : दिल्लीत जंतरमंतर येथे केवळ विद्यार्थी आणि सीजेपीचे सुरू असलेले हे आंदोलन आता राजकीय स्वार्थासाठी हायजॅक करण्यात आले असून, विरोधक विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केंद्र सरकारवर निशाणा धरत असल्याचा थेट आरोप राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
सामंत पुढे म्हणाले की, या आंदोलनामध्ये आता राहुल गांधी, अखिलेश यादव, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे प्रमुख विरोधी नेते सामील झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात असलेले सर्व पक्ष एकत्र येऊन या आंदोलनाचा वापर स्वतःच्या बुडत्या पक्षाला उभारी देण्यासाठी करत आहेत. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे समर्थन करत नाही; मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमधून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पोलिसांनी आधी बळाचा वापर केला की आंदोलकांनी पोलिसांवर हात उचलला, हे तपासणे गरजेचे आहे.
पवार-मोदी भेट राजकीय सुसंस्कृतपणा
सामंत यांनी पुनरुच्चार केला की, शिवसेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, पेपर फोडणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून मिळाले पाहिजे, हीच शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट हा राजकीय सुसंस्कृतपणाचा भाग असला, तरी इतर विरोधी पक्ष मात्र या आंदोलनावर स्वार होऊन स्वतःच्या पोळ्या भाजून घेत आहेत, अशी टीका करीत विशेषत: उबाठाला त्यांनी लक्ष्य केले.