रत्नागिरी : उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लोटे एमआयडीसीबाबत केलेल्या आरोपांना स्थानिक उद्योजकांनीच उत्तर दिले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आधी आपल्या वरळी मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे. वरळी कोळीवाड्यातील शौचालये, अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न तसेच चाळींचे प्रश्न सोडवून आपला मतदारसंघ २०२९ साठी महाराष्ट्रासमोर आदर्श कसा ठरेल, याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा रायगड-रत्नागिरी दौरा म्हणजे मंत्री भरत गोगावले आणि माझ्यावर टीका करणे हाच त्यांचा उद्देश होता. लोटे एमआयडीसीबाबत त्यांनी केलेल्या टीकेला स्थानिक उद्योजकांनीच उत्तर दिले आहे. त्यामुळे यावर मी फारसे बोलणार नाही. आदित्य ठाकरे यांनी आधी वरळी मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी लक्ष द्यावे. त्यानंतर त्यांनी आमच्या मतदारसंघात यावे. माझ्यामुळे आणि भरतशेठ यांच्यामुळे आदित्य ठाकरे घराबाहेर पडायला लागले, याचे मला समाधान आहे, असा उपरोधिक टोला सामंत यांनी लगावला.
बॉक्साईटबाबत जनतेची भूमिका महत्त्वाची
राजापूर येथील बॉक्साईट उत्खननाबाबत पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. या प्रकरणात स्थानिक जनतेच्या मनात जे आहे, तेच होईल. स्थानिक आमदार किरण सामंत यांची जी भूमिका असेल, तीच घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. शेवटी हा जनतेचा विषय आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांच्या आंदोलनाबाबत चर्चा सुरू
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेबाबत बोलताना सामंत म्हणाले की, आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी सरकारकडून दक्षता घेतली जात आहे. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांनी पाठवलेल्या सहा कलमी कार्यक्रमापैकी जास्तीत जास्त मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, हे करताना ओबीसी आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, याचीही दक्षता घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.